शपथविधी सोहळ्यात माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ही उपस्थित
नवी दिल्ली : भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना उपराष्ट्रपतीपदाची शपथ दिली. या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला होता.
आज शुक्रवारी सकाळी १० वाजता झालेल्या या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित होते. या सोहळ्यात माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ देखील उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसले. तसेच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी पक्षांचे नेतेही या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या गुजरात दौऱ्यामुळे या समारंभात सामील झाले नाहीत.
९ सप्टेंबर रोजी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.