म्हणाले-जनतेची होऊ शकते दिशाभूल
नवी दिल्ली : फिजिओथेरपिस्ट हे वैद्यकीय डॉक्टर नसल्याने त्यांनी ‘डॉ.’ (Dr.) हे संबोधन वापरू नये, असा स्पष्ट आदेश केंद्रीय आरोग्य सेवा संचालनालयाने दिला आहे. हे शीर्षक वापरल्याने रुग्णांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांना वैद्यकीय पात्रतेबद्दल गैरसमज होऊ शकतो, असेही या आदेशात म्हटले आहे.
नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशन्सने (एनसीएएचपी) नुकत्याच प्रस्तावित केलेल्या अभ्यासक्रमानुसार फिजिओथेरपिस्टना 'डॉ.' हे संबोधन वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, डीजीएचएसने ९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात यावर आक्षेप घेतला. फिजिओथेरपिस्ट हे वैद्यकीय डॉक्टर म्हणून प्रशिक्षित नसतात, त्यामुळे त्यांच्याद्वारे चुकीचे वैद्यकीय उपचार झाल्यास रुग्णाच्या जिवावर बेतू शकते अशी गंभीर चिंता डीजीएचएसने व्यक्त केली आहे.
डीजीएचएसने आपल्या पत्रात म्हटले आहे की, फिजिओथेरपिस्टनी ‘डॉ’ हे शीर्षक वापरल्यास ते इंडियन मेडिकल डिग्रीज ॲक्ट, १९१६ चे उल्लंघन ठरेल. ते रुग्णांचे निदान करण्यास सक्षम नसल्याने, त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाची स्थिती बिघडू शकते. यापूर्वी पटना आणि मद्रास उच्च न्यायालयांसह विविध वैद्यकीय परिषदांनीही फिजिओथेरपिस्टना 'डॉ.' हे संबोधन वापरण्यास मनाई केली आहे, याचाही उल्लेख डीजीएचएसने केला आहे.
डीजीएचएसने एनसीएएचपीला निर्देश दिले आहेत की, त्यांनी नवीन अभ्यासक्रमातून ‘डॉ.’ हे संबोधन वापरण्याची तरतूद तातडीने काढून टाकावी. ‘डॉ.’ हे शीर्षक केवळ नोंदणीकृत वैद्यकीय प्रॅक्टीशनर्स (मॉडर्न मेडिसिन, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी) यांनाच वापरण्याची परवानगी आहे, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. फिजिओथेरपीच्या पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही असे योग्य आणि सन्माननीय शीर्षक देण्याचा विचार करावा, असेही डीजीएचएसने सुचवले आहे.