कुणीही टेंडर घेतले तरी बायंगिणी कचरा प्रकल्प सुरू होणार नाही : राजेश फळदेसाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th September, 02:17 pm
कुणीही टेंडर घेतले तरी बायंगिणी कचरा प्रकल्प सुरू होणार नाही : राजेश फळदेसाई

पणजी : बायंगिणी येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थानिकांनी नेहमीच विरोध केला आहे. याबाबत कुणी कितीही टेंडर काढले तरी काहीही फरक पडत नाही. याआधी तिघा जणांनी टेंडर घेतले होते. मात्र तिथे काम सुरू झाले नाही. चौथ्या वेळेस कोणी टेंडर घेऊन काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास सर्वप्रथम मी तिथे जाऊन विरोध करणार असे प्रतिपादन आमदार राजेश फळदेसाई यांनी केले. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फळदेसाई म्हणाले की, कचरा व्यवस्थापन प्रकल्पाजवळ मोठी लोकवस्ती वाढली आहे. आज तिथे ८ हजार लोक राहतात. येथे जवळच शाळा, चर्च, इस्पितळ, मठ आहे. ही जागा जागतिक वारसा स्थळाची आहे. असे असताना येथे कचरा प्रकल्प येऊच शकत नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो असून त्यांनी प्रकल्प होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांचा या प्रकल्पाला कायम विरोध राहील. याबाबत मंत्र्यांची आणि माझी भूमिका वेगळी असली तरी याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल.

ते म्हणाले, गवंडाळी येथील उड्डाण पुलाचे काम वेगाने सुरू आहे. डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. करमळी तलावाच्या सुशोभीकरणाचे टेंडर काढण्यात आले आहे. पुढील महिन्यात हे काम सुरू केले जाईल. नव्याने बांधण्यात येणाऱ्या जुने गोवे पोलीस स्थानकाचे काम लवकरच सुरू होईल. येथे हजारो पर्यटक येत असल्याने पोलीस स्थानक आवश्यकच आहे. ही जागा सरकारची असून बांधकामासाठी आवश्यक ते सर्व परवाने घेण्यात आले आहेत.

श्री सप्तकोटेश्वर मंदिरामुळे पर्यटनाला चालना

फळदेसाई म्हणाले की, श्री सप्तकोटेश्वर मंदिर बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करतो. मंदिरामुळे दिवाडी मधील पर्यटनाला चालना मिळेल. दिवाडीसाठी दोन रो-रो फेरी देणे, रस्ते रुंदीकरण करणे व अन्य सुविधांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहोत.

हेही वाचा