मडगाव : राज्यात होणार्या इंडिया एनर्जी वीकसाठी सहभागींना बेतूल येथे नेण्याआणण्यासाठीचे काम स्थानिक टॅक्सीचालकांना मिळावे. यासाठी यापुढे राज्यात होणार्या कोणत्याही सरकारी किंवा इतर इव्हेंटसाठी, निवडणुकांवेळी व उपक्रमांसाठी आवश्यक टॅक्सी या स्थानिकांकडून घेण्यात याव्या. याचा समावेश नव्या धोरणातही व्हावा, अशी मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली आहे.
बाणावली येथे स्थानिक टॅक्सीचालक व मालक असोसिएशन यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर आमदार व्हेंझी यांनी सांगितले की, टॅक्सीचालकांसाठी धोरण १० सप्टेंबरपर्यंत ठरवण्यात येणार होते पण मुख्यमंत्र्यांनी अजूनही धोरण ठरवलेले नाही त्यासाठी आणखी आठ ते दहा दिवस लागतील, त्याचा मसुदा अजूनही सुरु असल्याचे सांगितलेले आहे. राज्यात होणार्या इंडिया एनर्जी वीकसाठी तयारी सुरु झालेली आहे. हॉटेल्सची बुकींगही झालेली आहेत. ओएनजीसीचे अनेक मान्यवर याठिकाणी येणार आहेत. बेतूल येथे होणार्या इंडिया एनर्जी वीकसाठी बाणावली, मडगाव व इतर भागातून सहभागींना नेण्यासाठी टॅक्सी वाहतुकीचे काम दुसर्या कुणालातरी दिलेले आहे. त्यात स्थानिक टॅक्सीचालकांना सहभागी करुन घेतलेले नाही. त्यामुळे इव्हेंटसाठी ज्या गाड्या लागतात त्या स्थानिक टॅक्सीचालकांकडून घेण्यात याव्यात, यासाठी निवेदन दिले जाईल व याचा समावेश टॅक्सी धोरणातही व्हावा, अशी मागणी व्हेंझी यांनी केली. विमानतळावरुन हॉटेलमध्ये प्रवाशांना सोडल्यानंतर परिसरात फिरण्यासाठी स्थानिक टॅक्सींचा वापर करण्यात यावा. याबाबत बोलणे करुन समजावण्यात येईल, असे व्हेंझी यांनी स्पष्ट केले.
टॅक्सी अॅपची अॅग्रीग्रेटरची आवश्यकता नाही
राज्यात टॅक्सी अॅपसाठी केलेला मसुदा मंजूर झालेला नाही. त्यामुळे आता टॅक्सी धोरण तयार केले जात आहे. टॅक्सीचालकांनी टॅक्सी अॅप गरजेचे नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. केवळ पैशांच्या देवाणघेवाणीसाठी व सुरक्षिततेसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म असावा. टॅक्सी अॅप अॅग्रीग्रेटर नोंदणीची आवश्यकता नाही. अॅप अॅग्रीग्रेटर आल्यास कुणीही नोंदणी करतील व त्याचा परिणाम स्थानिक टॅक्सीचालकांवर होईल, असे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.