‘मत्स्य संपदा’ योजनेच्या माध्यमातून सिल्विया बनल्या ‘आत्मनिर्भर’

कुडतरी येथे नदीपात्रात पिंजऱ्यातील मत्स्यपालन : दरवर्षी मिळवतात १० ते १२ लाखांचे उत्पन्न

Story: अजय लाड |
3 hours ago
‘मत्स्य संपदा’ योजनेच्या माध्यमातून सिल्विया बनल्या ‘आत्मनिर्भर’

मडगाव : सरकारी योजनांचा लाभ घेताना परिश्रमाची जोड दिल्यास यश दूर नाही, हे कुडतरी येथील सिल्विया फर्नांडिस यांनी दाखवून दिले आहे. सिल्विया यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेऊन नदीपात्रात पिंजऱ्यातील मत्स्यपालन करत दरवर्षी लाखोंचा व्यवसाय करत त्या आत्मनिर्भर बनल्या आहेत.       

कुडतरी सोनशे परिसरातील रहिवासी सिल्विया फर्नांडिस यांनी घरानजीकच्या नदीपात्रात पिंजऱ्यातील मत्स्यपालनाचा प्रकल्प सुरू केला आहे. पहिल्या दोन वर्षांतील अनुभवातून आता त्या दरवर्षी १० ते १२ लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत. 

सिल्विया यांनी सांगितले की, २०२२ मध्ये प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेबाबतची माहिती मिळाली. प्रकल्प उभारणी व त्यानंतरच्या काळात मत्स्योद्योग खाते, आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून सहकार्य लाभले. अडचणी आल्यास त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. पती क्लेमेंट हे मच्छीमार असून त्यांचा मोठा हातभार या व्यवसायासाठी लाभला.

सोनशे कुडतरी येथील घरानजीक असलेल्या नदीपात्रात सध्या १२ पिंजरे उभारले आहेत. या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यपालन केले जाते. पाळीव माशांचे बीज कुमठा-कर्नाटक येथून आणण्यात येते. त्यांना विकत मिळणाऱ्या खाद्याची सवय असते, ती बदलण्यासाठी पहिले दोन महिने दिवसातून दोन वेळा मत्स्य खाद्यासह कापलेल्या मासळीचे तुकडे दिले जातात. साधारणत: सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत मासळी विक्रीसाठी तयार होतात. मासळीचे बीज थोडे मोठे आणल्यास ९५ टक्के मासळीचे उत्पादन मिळते. पहिल्या वर्षी २५० किलो मासळीचे बीज आणले होते. आता त्यात वाढ करून साडेतीन ते चार हजार किलो बीज आणले जाते. सात महिन्यांनी विक्रीसाठी काढल्यावर साधारणत: ७०० रुपये किलोने मासळी विक्री होते.

ड्रममध्ये खेकडा पालन 

मत्स्यसंपदा योजनेचा फायदा घेऊन नदीपात्रात पिंजऱ्यातील मत्स्यपालनासह ड्रममध्ये खेकडे पालनाचा प्रकल्पही केला होता. यावर्षीही ऑक्टोबर महिन्यात खेकडा पालनाची तयारी सुरू होईल. त्यातूनही चांगला फायदा मिळतो. या योजनेचा फायदा आता आपल्यासह गावातील आणखी दोन ते तीन जणांकडून घेतला जात आहे. त्यामुळे सरकारने मत्स्यसंपदा योजना सुरू ठेवून आणखी मत्स्योत्पादकांना स्वयंपूर्ण करावे, असे सिल्विया यांनी सांगितले.  

समाजमाध्यमांवरूनही ऑडर्स  

पिंजऱ्यातील मत्स्यपालन ही संकल्पना राज्यात नवीन होती, त्याची अंमलबजावणी कोणीही केलेली नसताना आम्ही हा प्रकल्प राबविला. मार्केटमध्ये ताजी व जिवंत मासळी विक्रीसाठी नेत असल्याने लोकांचाही आमच्यावर विश्वास वाढलेला आहे. मासळीला चांगला भाव मिळतो. आता शनिवारी, रविवारी मासळी घेण्यासाठी घराकडे गर्दी होते, तसेच फेसबुक, व्हॉटसअपवरूनही ऑर्डर्स येत असतात, असे सिल्विया यांनी सांगितले.

हेही वाचा