पणजी : गोव्यातील एमआरएफ टायर कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे नोकरभरती मेळाव्याचे आयोजन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी यावर तीव्र आक्षेप घेत, गोव्यातील खाजगी कंपन्या बाहेरच्या राज्यांतील उमेदवारांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने एमआरएफ टायर कंपनीने १२ सप्टेंबर रोजी कुडाळमध्ये नोकरभरती मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कंपनीत २५० प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) पदांसाठी भरती केली जाणार आहे. आठवी ते पदवीधर उमेदवारांसाठी १७,५०० ते १९,५०० रुपये मासिक वेतनासह वार्षिक पगारवाढ, राहण्याची आणि जेवणाचीही सोय अशा सुविधा जाहीर करण्यात आल्या आहेत.
‘सरकारचे नियंत्रण नाही’
गोव्यातील खाजगी कंपन्या आपल्या नोकऱ्या परराज्यांतील राजकारण्यांमार्फत बाहेरच्या लोकांना विकत आहेत आणि सरकारचे यावर कोणतेही नियंत्रण नाही, अशी टीका केली. ते पुढे म्हणाले, "भाजपचे डबल इंजिन सरकार गोव्यातील तरुणाईच्या संयमाचा अंत पाहत आहे. हे खपवून घेतले जाणार नाही असे मनोज परब यांनी या जाहिरातीचा निषेध करत म्हटले.
उच्च शिक्षण घेऊनही गोमंतकीय तरुण ८ ते १० हजार रुपयांच्या पगारावर काम करत असताना, जास्त पगार असलेल्या नोकऱ्या बाहेरच्या लोकांना का दिल्या जात आहेत? असा सवाल परब यांनी उपस्थित केला. त्यांनी एमआरएफ कंपनीच्या व्यवस्थापनाला ही भरती ताबडतोब थांबवण्याची मागणी केली. तसेच, महाराष्ट्रातील सरकार गोव्यातील लोकांसाठी अशा प्रकारे नोकरभरती मेळावा आयोजित करण्यास परवानगी देईल का, असा सवालही त्यांनी केला.