पणजी : गोवा सरकारने अकुशल मनरेगा कामगारांची दिवसाची मजुरी २२ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी गोव्यात मनरेगा कामगारांना दिवसाला ३५६ रुपये मजुरी मिळत होती. यामध्ये २२ रुपयांची वाढ करून ती दिवसाला ३७८ रुपये करण्यात आली आहे. याबाबत ग्रामीण विकास खात्याचे प्रकल्प संचालक प्रेमराज शिरोडकर यांनी नुकतीच अधिसूचना जारी केली.
अधिसूचनेत म्हटले आहे की, केंद्रीय ग्रामीण विकास खात्याने मार्च २०२५ मध्ये देशातील विविध राज्यांसाठी मनरेगा योजनेंतर्गत मजुरीचे नवीन दर अधिसूचित केले होते. यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी गोव्यात अकुशल मनरेगा कामगारांना दिवसाची मजुरी वाढवून ३७८ रुपये करण्याचा निर्णय झाला होता. यानुसारच गोव्यातील ग्रामीण विकास खात्याने मजुरीचे नवीन दर १ एप्रिल २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास खात्यातर्फे नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मनरेगा योजनेअंतर्गत मजुरीचे नवीन दर जाहीर केले जातात. केंद्राने २७ मार्च २०२५ मध्ये नवीन दर जाहीर केले होते. गतवर्षीच्या तुलनेत राज्यानुसार मजुरी दरात ५ ते ८ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षासाठी हरियाणामध्ये सर्वाधिक ४०० रुपये प्रतिदिन दर ठरवण्यात आला आहे. तर अरुणाचल प्रदेश मध्ये सर्वात कमी २४१ रुपये प्रतिदिन मजुरी दर ठरवण्यात आला होता.
मजुरी दरात गोवा दुसऱ्या स्थानी
सर्वाधिक मजुरी दर देण्यामध्ये हरियाणानंतर (४०० रू.) गोव्याचा (३७८ रू.) क्रमांक लागतो. यानंतर कर्नाटक (३७० रू.), केरळ (३६९ रू.), पंजाब (३४६ रू.), तामिळनाडू (३३६ रू.), या राज्यांच्या क्रमांक लागतो. केंद्र शासित प्रदेशात निकोबार जिल्ह्यात सर्वाधिक ३६१ रुपये मजुरी दर ठरवण्यात आला आहे.