गोवा आपत्ती व्यवस्थापनात आत्मनिर्भर होणार : मुख्यमंत्री सावंत

गोवा विद्यापीठ आणि ‘इन्कोयस’मध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी सामंजस्य करार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
गोवा आपत्ती व्यवस्थापनात आत्मनिर्भर होणार : मुख्यमंत्री सावंत

पणजी : गोवा आपत्ती व्यवस्थापनात स्वावलंबी होण्यासाठी काम करत आहे. किनारी भागांत पूर आणि त्सुनामीच्या धोक्याला तोंड देण्यासाठी राज्याने आपली तयारी अधिक बळकट केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा विद्यापीठ आणि ‘इन्कोयस’ (INCOIS) यांच्यात आपत्ती धोके व्यवस्थापनावर सामंजस्य करार झाल्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याची १०८ किलोमीटर लांबीची किनारपट्टी ही आपली ताकद तसेच कमकुवतपणा देखील आहे. वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांना आणि बदलत्या समुद्री परिस्थितीला आपण तोंड दिले आहे. त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापनाद्वारे धोका ओळखण्यात गोवा आघाडीवर आहे. आम्ही यासाठी आवश्यक कार्यपद्धती (SOP) विकसित केली असून, जनजागृतीवर भर देत आहोत.

राज्यातील प्रत्येक गाव जागरूक, आत्मनिर्भर आणि तयार असले पाहिजे, असे ‘स्वयंपूर्ण गोवा २.०’ अंतर्गत आमचे उद्दिष्ट आहे. मच्छीमारांना त्यांच्या मोबाईलवर समुद्राची माहिती आणि मासेमारीसाठी योग्य जागांची माहिती दिली जाते. तसेच, किनारपट्टीवरील पंचायतींना आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘पहिले प्रतिसाद देणारे’ किंवा फर्स्ट रिस्पॉण्डर म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे.

‘आपदा मित्र’ अंतर्गत ३०० तरुण तयार

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने अग्निशमन दलाच्या माध्यमातून ३०० युवक-युवतींना ‘आपदा मित्र’ म्हणून विनामूल्य प्रशिक्षण दिले आहे. प्रत्येक दोन-तीन गावांकरिता एक ‘आपदा मित्र’ तयार केला आहे. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

हेही वाचा