बोडगिणी येथे होणार जलवाहिनीच्या आंतरजोडणीचे काम
म्हापसा: बोडगिणी, म्हापसा येथे ३५० एमएम क्षमतेच्या स्थानांतरित जलवाहिनीच्या आंतरजोडणीचे काम मंगळवार, दिनांक १६ रोजीपेयजल पुरवठा खात्यातर्फे (डीडीडब्लू) हाती घेतले जाणार आहे. परिणामी, त्या दिवशी आसगाव, हणजूण-कायसूव, पर्रा, हडफडे-नागवा या संपूर्ण पंचायत क्षेत्रात तसेच कळंगुटमधील काही भागांत मर्यादित पाणीपुरवठा होईल.
सध्या म्हापसा ते कळंगुट रस्त्यावरील गांधी चौक ते बोडगिणी दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. बोडगिणी येथील पुलाच्या कडेला असलेली जलवाहिनी काही अंतरावर स्थानांतरित करण्याचा निर्णय पेयजल पुरवठा खात्याने घेतला आहे. ही जवळपास १५ ते २० मीटर अंतराची जलवाहिनी स्थानांतरित होणार असून, तिला आंतरजोडणी दिली जाणार आहे.
हे काम खात्यामार्फत मंगळवार, दिनांक १६ रोजी एका दिवसात करण्यात येणार असून, त्यामुळे त्या दिवशी वरील गावांमध्ये मर्यादित पाणीपुरवठा होईल, अशी सार्वजनिक नोटीस पेयजल खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत जारी करण्यात आली आहे.