म्हापसा : गोव्यात घातक अन्नपदार्थांचे वितरण करून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे प्रकार अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईतून समोर येत आहेत. याच मालिकेत आता म्हापसा येथील गावसावाडा येथे एका बेकायदेशीर आणि गलिच्छ जागेत देशी दही तयार करणारे युनिट उघडकीस आणत एफडीएने या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे युनिट आवश्यक परवान्याशिवाय कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
आज शुक्रवारी १२ रोजी सकाळी अन्न व औषध प्रशासनाने या बेकायदेशीर आस्थापनावर छापा टाकला. युनिटमध्ये तयार केलेले दही, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ बार्देश, तिसवाडी, पेडणे आणि इतर भागांतील हॉटेल्स, रेस्टॉरंटना सकाळच्या वेळी वाहनातून वितरित केले जात होते. युनिटचा सुगावा लागताच छापा टाकण्यात आला, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एफडीएने या युनिटच्या मालकाला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, आस्थापनातील सर्व दही व दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. तसेच, ही जागा त्वरित रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. युनिटचा चालक चंद्रपाल याने सांगितले की, तो इथे दही तयार करत असला तरी, त्याच्याकडे केवळ वितरणाचा परवाना आहे, उत्पादनाचा नाही. दरम्यान, युनिटमध्ये पनीरचा साठा आढळल्याने एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पनीरपासून दही बनवले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.