पणजी पोलिसांकडून कारवाई
पणजी : येथील एका हाॅटेलच्या खोलीत ठेवलेली ५.७० लाख रुपयांची रोख रक्कम पळविण्यात आली आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी थुमु रवितेजा (हैदराबाद) आणि अश्रफ शेख (तेलंगणा) या दोघांना अटक केली आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मधुगुला कार्तिक यांनी तक्रार दाखल केली आहे. ९ सप्टेंबर २०२५ रोजी संशयित थुमु रवितेजा आणि अश्रफ शेख या दोघांनी त्याच्याशी मैत्री केली. ते तिघे पणजीतील एका हाॅटेलात एकाच खोलीत वास्तव्यास होते. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते सायंकाळी तीन दरम्यान तक्रारदाराच्या बॅगेत ठेवलेले ५.७० लाख रुपये चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले. याची दखल घेऊन पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान पोलिसांनी हाॅटेल तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, वरील संशयितांचा चोरीत सहभाग असल्याचे समोर आले.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक महेश नाईक, चालक विकास नाईक व इतरांनी शोध घेऊन दोघांना अटक केली. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता, संशयितांनी चोरीची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश नाईक पुढील तपास करीत आहेत.