महिला चालकाविरुद्ध हणजूण पोलिसांकडून गुन्हा नोंद
म्हापसा : शिवोली येथे ‘हिट अॅण्ड रन’ अपघात प्रकरणी महिला चालकाविरुद्ध हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. गंभीर जखमी दुचाकीस्वार गजानन मोये (७३, शिवोली) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
अपघात रविवार, दि. ७ रोजी सकाळी ८.२७ वा. सुमारास मार्ना शिवोली येथील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ घडला होता. गजानन मोये हे आपल्या जीए ०३ एजी २५६० क्रमांकाच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून शिवोली सेंट अॅन्थनी चर्चकडे येत होते. त्यांनी वाटेत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाणाऱ्या एका महिलेला लिफ्ट दिली होती.
दुचाकीला मागून येणाऱ्या एका अज्ञात कारने ठोकर दिली आणि संशयित कारसह घटनास्थळावरून पळून गेली. अपघातात दुचाकीचालक मोये यांना गंभीर जखम झाली तर मागे बसलेली महिला किरकोळ जखमी झाली. जखमी मोये यांना शिवोली आरोग्य केंद्रातून पुढील उपचारार्थ गोमेकॉत दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, मागे बसलेली ती महिला उपचाराविना घरी गेली.
घटनेची माहिती हणजूण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. अपघातास कारणीभूत जीए ०३ एएच ९८६२ क्रमांकाच्या बलेनो कारची ओळख पटवली. नंतर ही कार पोलिसांनी जप्त केली. कारचालक रिया शुक्ला (मूळ उत्तरप्रदेश) हिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश शेटगावकर हे करीत आहेत.