लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुरावे नसल्यामुळे युवक आरोपमुक्त

बार्देश तालुक्यातील आश्रमातील अत्याचार प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th September, 11:46 pm
लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुरावे नसल्यामुळे युवक आरोपमुक्त

पणजी : बार्देश तालुक्यात पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतेही वैद्यकीय पुरावे नाहीत. तसेच घरमालकाच्या जबाबात तफावत असल्याचे समोर आले आहे, असे निरीक्षण नोंदवून संशयित युवकाला पणजी येथील जलदगती न्यायालयाने आरोपातून मुक्त केले. याबाबतचा आदेश न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला आहे.

बार्देश तालुक्यातील एका आश्रमात वास्तव करणाऱ्या मुलीने पोलिसात १४ जून २०२३ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यात तिने आश्रमाच्या कर्मचारी युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले होते. याची दखल घेऊन पोलिसांनी संशयित युवकावर गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात सुनावणी झाली असता, पीडित मुलगी आणि आणखी एका मुलीला इतर राज्यातून सदर आश्रमात शिक्षणासाठी ठेवण्यात आले होते. पीडित मुलीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार संदर्भात कोणाला सांगितले नव्हते. तिची आणि आश्रम मालकाबरोबर असलेली मैत्री संशयित युवक आणि इतरांना आवडत नव्हती.

घटना घडली त्या दिवशी इतर मुली आणि कर्मचारी आश्रमात होते. याशिवाय मालकाने संशयिताविरोधात दिलेल्या जबाबात तफावत अाहे. तसेच वैद्यकीय अहवालात पीडित मुलीवर कोणत्याही प्रकारचे लैंगिक अत्याचार झाल्याचे पुरावे समोर आले नाहीत, असा युक्तिवाद संशयिताच्या वकिलाने न्यायालयात मांडला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित युवकाला आरोपातून मुक्त केले आहे. 

हेही वाचा