१६ ते २४ सप्टेंबरदरम्यान संशयितांची होणार चौकशी
पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने चिकोळणा-बोगमोळो परिसरात छापा टाकून तब्बल ४३.२० कोटींचे ४.३२ किलो कोकेन जप्त केले होते. यात मनी लाँड्रिंगचे प्राथमिक पुरावे आढळून आल्यामुळे कोलवाळ तुरुंगात सध्या असलेल्या वाडेकर दाम्पत्यासह इतर संशयितांची चौकशी करण्यासाठी ईडीने न्यायालयाची परवानगी मागितली होती. मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ईडीची ही विनंती मान्य केली असून १६ ते २४ सप्टेंबरदरम्यान संशयितांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.
गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने १४ एप्रिल, २०२५ रोजी चिकोळणा बसस्थानक परिसरात छापा टाकून ४३.२० कोटी रुपये किमतीचे ४.३२ किलो कोकेन जप्त केले होते. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला निबू व्हिन्सेंट, रेश्मा वाडेकर आणि तिचा पती मंगेश या तिघा संशयितांना अटक केली होती. चौकशीत रेश्मा वाडेकर विदेशातून वरील ड्रग्ज घेऊन आल्याचे समोर आले. तसेच तिला विदेशात पाठवण्यासाठी मदत करणाऱ्या गुजरातच्या चिराग रमेशभाई डुधात याच्यासह तारिरो ब्राइटमोर मंगवाना या झिम्बाब्वेचा नागरिकाला अटक केली. याच दरम्यान न्यायालयाने तारिरो ब्राइटमोर मंगवाना याची जामिनावर सुटका केली होती.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचे तसेच त्यात मनी लाँड्रिंगचा संशय असल्याचे समोर आल्यानंतर ईडीच्या गोवा विभागाचे अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. भागीरथ चौधरी, अविनाश झा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने १९ आॅगस्ट रोजी चिकोळणा-बोगमोळो येथील वाडेकर आणि व्हिन्सेंट यांच्या घरावर छापा टाकून महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. त्याच दिवशी ईडीने चिराग रमेशभाई डुधात याच्या गुजरात येथील घरावरही छापा टाकला होता. याशिवाय मुंबई, दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल, हरयाणा, झारखंड आणि उत्तर प्रदेश येथील ठिकाणांवर छापा टाकला. छाप्यात ईडीने महत्त्वाच्या दस्तावेजांसह इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस व इतर वस्तू जप्त केल्या. याच दरम्यान २१ आॅगस्ट रोजी ईडीने तारिरो ब्राइटमोर मंगवाना याला चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यावेळी सहकार्य करत नसल्यामुळे मंगवाना याला अटक केली.
कोलवाळ तुरुंगातील संशयितांच्या चौकशीस परवानगी
ईडीने न्यायालयात अर्ज सादर करून कोलवाळ तुरुंगात रवानगी केलेल्या इतर संशयितांच्या चौकशीसाठी परवानगी मागितली होती. या अर्जावर विशेष अभियोक्ता सिद्धार्थ सामंत यांनी युक्तिवाद मांडला. त्यांना अॅड. प्रभा नाईक यांनी साथ दिली. न्यायालयाने याची दखल घेत वाडेकर दाम्पत्यासह इतर संशयितांची चौकशी करण्यास परवानगी दिली असून ही चौकशी १६ ते २४ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.