अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल : पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्याची नागरिकांची मागणी
वाळपई : येथील नगरपालिका क्षेत्रातील जितेंद्र काटकर यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी गुरांची हाडे टाकल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे काटकर कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा घटनांमुळे शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काटकर यांच्या घरासमोर गुरांची हाडे टाकण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून तपासणी केली. प्राथमिक तपासात सदर हाडे ही गुरांची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ती जप्त करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकारांशी बोलताना जितेंद्र काटकर म्हणाले, घरासमोर अशाप्रकारे गुरांची हाडे टाकून कुटुंबाला त्रास देण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत असून, पोलिसांनी केवळ तपासापुरते मर्यादित न राहता कठोर कारवाई करावी.
दरम्यान, नागरिकांनी देखील या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही वाळपईत अशा घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
शहरात अशा घटनांनी तणावाची शक्यता : काटकर
वाळपई नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जितेंद्र काटकर यांनी केली. अशा घटना सुरू राहिल्यास शहरात गंभीर तणाव निर्माण होऊ शकतो, असा इशाराही काटकर यांनी दिला.