म्हापसा : अपघातात जखमी आणि आरोपीने सामंजस्याने आपापसात प्रकरण मिटवल्यामुळे निष्काळजीपणे वाहन हाकून अपघात घडवल्याच्या खटल्यातून केरळमधील संशयित युवकाची म्हापसा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
तार बस्तोडा येथील उड्डाणपुलावर १ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वा. अपघात घडला होता. कारचालक संशयित आरोपी रोशन अलेक्झांडर (रा. केरळ) हा भरधाव वेगाने कोलवाळ ते पणजीच्या दिशेने कार घेऊन जात होता.
संशयिताने सावधगिरी न बाळगता, वेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवत विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटरला धडक दिली होती. त्यामुळे जखमी दुचाकीस्वाराला शारीरिक दुखापत झाली होती.
यासंदर्भांत म्हापसा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या २७९ व ३३८ कलमान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.
या खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीने आपण निर्दोष असल्याचे सांगितले व आपल्या बचावासाठी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. पीडित जखमीने न्यायालयाला सांगितले की, ते खटला पुढे चालवू इच्छित नाहीत, कारण त्याने आरोपीसोबत प्रकरण मिटवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे प्रकरण न्यायालयाच्या बाहेर आरोपी व पीडिताने सामंजस्याने मिटवले गेल्याचे नमूद करीत न्यायालयाने वरील गुन्ह्यातून अलेक्झांडर याला दोषमुक्त करण्याचा निवाडा दिला.