बिट्स पिलानीतील विद्यार्थ्याचा मृत्यू : आतापर्यंतच्या प्रकरणांत प्रथमच आढळले ड्रग्ज

दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा : सर्व बाजूंनी तपास सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
बिट्स पिलानीतील विद्यार्थ्याचा मृत्यू : आतापर्यंतच्या प्रकरणांत प्रथमच आढळले ड्रग्ज

मडगाव : बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असला, तरी ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात प्रथमच ड्रग्ज आढळल्याचे उघड झाले आहे. रॅन्ड्रोक्स या मशिनवर रक्ताची चाचणी केली जाते. त्या चाचणीतून ऋषी नायरच्या शरीरात ड्रग्जचे अंश असल्याचे आढळून आलेले आहेत. ऋषी नायरला हे ड्रग्ज कसे आणि कुठून मिळाले, या सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.



बिट्स पिलानी कॅम्पस किंवा दक्षिण गोव्यातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या आवारात ड्रग्ज आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी शाळा, महाविद्यालयांजवळील दुकाने आणि आस्थापनांची तपासणी मोहीम आधीच सुरू केली असून, ती आणखी तीव्र केली जाईल. जर कोणी विद्यार्थ्यांना असे प्रतिबंधित पदार्थ पुरवत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे पोलीस अधीक्षक वर्मा म्हणाले.

दरम्यान, बिट्स पिलानी कॅम्पसमध्येही आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, पोलिसांकडून अचानक तपासणी केली जात आहे. कॅम्पस सुरक्षारक्षक आणि स्थानिक पोलीस यांच्यात नियमित संपर्क असून, शैक्षणिक संस्थांमध्ये होणारा ड्रग्जचा पुरवठा रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, असेही वर्मा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा