विविध पदांसाठी शनिवार-रविवारी पार पडणार सीबीटी-२ परीक्षा

दिव्यांग उमेदवारांना ३५ मिनिटे अधिक वेळ

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
43 mins ago
विविध पदांसाठी शनिवार-रविवारी पार पडणार सीबीटी-२ परीक्षा

पणजी : तांत्रिक साहाय्यक, तांत्रिक अधिकारी तसेच साहाय्यक शिक्षकांच्या पदांसाठी उद्या शनिवार १३ सप्टेंबर व रविवारी (१४ सप्टेंबर रोजी सीबीटी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी इतर उमेदवारांपेक्षा दिव्यांग उमेदवारांना ३५ मिनिटांचा अधिक वेळ मिळेल. ८० गुणांच्या पेपरसाठी सर्व उमेदवारांना १०० मिनिटे मिळतील, तर दिव्यांग उमेदवारांना १३५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. पेपर पूर्ण करून सादर केल्यानंतर उमेदवाराला लगेचच स्क्रीनवर गुणांची माहिती मिळेल.

तांत्रिक पदांसाठी परीक्षा

तांत्रिक साहाय्यक (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) या पदासाठी शनिवार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १.४० या वेळेत सीबीटी-२ परीक्षा होईल. ही परीक्षा उत्तर गोव्यामध्ये आग्नेल इन्स्टिट्यूट (आसगाव) येथे, तर दक्षिण गोव्यात डॉन बॉस्को इंजिनिअरिंग कॉलेज (फातोर्डा) आणि एनआयटी (कुंकळ्ळी) येथे होणार आहे.

त्याचप्रमाणे, रविवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी तांत्रिक साहाय्यक (कॉम्प्युटर/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी), प्रोग्रामर, तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदांसाठी दुपारी १२ ते १.४० या वेळेत परीक्षा होईल. उत्तर गोव्यात आग्नेल इन्स्टिट्यूट (आसगाव) आणि सेंट झेवियर महाविद्यालय (म्हापसा) येथे, तर दक्षिण गोव्यात डॉन बॉस्को इंजिनिअरिंग कॉलेज (फातोर्डा), रोजरी महाविद्यालय (नावेली) आणि एनआयटी (कुंकळ्ळी) येथे ही परीक्षा होणार आहे. तांत्रिक साहाय्यक (सिव्हिल) पदासाठीची परीक्षा याच दिवशी दुपारी ३.३० ते ५.१० या वेळेत वरील पाचही परीक्षा केंद्रांवर होईल.

सहाय्यक शिक्षक पदासाठी परीक्षा

सहाय्यक शिक्षक पदासाठी एकच सीबीटी होणार असून, त्यासाठी सहा तुकड्या करण्यात आल्या आहेत. पहिल्या तीन तुकड्यांसाठीची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी, तर उर्वरित तुकड्यांसाठीची परीक्षा १४ सप्टेंबर रोजी होईल.

शनिवार, १३ सप्टेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, गणित व संस्कृत विषयांच्या पदांसाठीची परीक्षा होईल. ही परीक्षा उत्तर गोव्यात आग्नेल इन्स्टिट्यूट (आसगाव) येथे, तर दक्षिण गोव्यात डॉन बॉस्को इंजिनिअरिंग कॉलेज (फातोर्डा) आणि एनआयटी (कुंकळ्ळी) येथे होईल. उर्वरित विज्ञान, कोकणी, समाजशास्त्र व मराठी विषयांच्या पदांसाठीची परीक्षा रविवार, १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. ही परीक्षा उत्तर गोव्यात आग्नेल इन्स्टिट्यूट (आसगाव) आणि सेंट झेवियर महाविद्यालय (म्हापसा) येथे, तर दक्षिण गोव्यात डॉन बॉस्को इंजिनिअरिंग कॉलेज (फातोर्डा), रोजरी महाविद्यालय (नावेली) आणि एनआयटी (कुंकळ्ळी) येथे होणार आहे.

हेही वाचा