पणजी : विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणांत बिट्स पिलानी, गोवा कॅम्पसच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते युरी आलेमाव आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रक जारी करून ही मागणी केली.
काँग्रेस नेते युरी आलेमाव म्हणाले की, बिट्स पिलानीच्या ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या नमुन्यांमध्ये एक्स्टसी, एमडीएमए आणि ऍम्फेटामाईन्स आढळले आहेत. गोवा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. आत्महत्या टाळण्यासाठी उपाययोजना लागू करण्यात संस्था अपयशी ठरली असेल, तर व्यवस्थापनालाही जबाबदार धरले पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे ऑडिट करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.