सासष्टी : क्रीडा क्षेत्रात कधीही राजकारण केले नाही : मंत्री कामत

वर्ल्ड अ‍ॅक्वाटिक्स ब्युरोच्या सदस्यपदी निवडीबद्दल गोवा जलतरण असोसिएशनकडून सत्कार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
सासष्टी : क्रीडा क्षेत्रात कधीही राजकारण केले नाही : मंत्री कामत

मडगाव : क्रीडा क्षेत्रात काम करताना मी कधीही राजकारण केले नाही. सर्वांना सोबत घेऊन काम केले. क्रीडा क्षेत्रात काम करताना जागतिक स्तरावर पोहोचू, असा विचार केलेला नव्हता. पण नशीब कुणीही बदलू शकत नाही. अनेक जण खूप काही बोलतात. पण मी त्याकडे लक्ष देत नाही, असे प्रतिपादन पीडब्ल्यूडी मंत्री दिगंबर कामत यांनी केले.

वर्ल्ड अ‍ॅक्वाटिक्स ब्युरोच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मंत्री दिगंबर कामत यांचा गोवा जलतरण असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक अवधूत तिंबलो, अल्बर्ट कुलासो, इंडिया जलतरण असोसिएशनचे सरचिटणीस मोनल चोक्सी, गुरुदत्त दत्ता, फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष कायतान सिल्वा, अनिल मडगावकर, सुदेश नागवेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात जलतरण क्षेत्रातील निवृत्त प्रशिक्षक, प्रशिक्षक व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

वर्ल्ड अ‍ॅक्वाटिक्स समितीवरील कामत यांची निवड ही भारतासाठीच नाही, तर जगासाठी मोठी संधी आहे. त्यांच्या राजकीय, क्रीडा अनुभवाचा फायदा वर्ल्ड अ‍ॅक्वाटिक्स ब्युरोला नक्कीच होईल व या क्षेत्रातील इकोसिस्टिमला याचा फायदा होईल, असे मोनल चोक्सी यांनी सांगितले.

मला कोणी ‘देवाचा मनीस’ म्हटला, तरीही वाईट वाटत नाही. माझ्यामुळे नास्तिकांच्या तोंडीही देवाचे नाव येते. हे यश माझ्यासमवेत काम केलेल्या सर्वांचे आहे. राजकारणापेक्षा क्रीडा क्षेत्रामुळे जास्त माणसे जोडली गेली, असे मंत्री कामत म्हणाले.

यावेळी मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, राजकीय कारकीर्द सोडून हा कार्यक्रम क्रीडा कारकिर्दीसाठी समर्पित आहे. याचसाठी विविध क्री​डा प्रकारातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मला बॅडमिंटनची आवड होती. बॅडमिंटन असोसिएशनमधून जलतरण असोसिएशनमध्ये गेलो. जलतरण असोसिएशनच्या राष्ट्रीय समितीवर गेलो व आता जागतिक समितीवर निवड झाली. विविध असोसिएशनमध्ये काम केले. कुठेही कधीही भेदभाव केलेला नाही. क्रीडा क्षेत्रात कधीही राजकारण केलेले नाही. विचार पटले नसले, तरीही सर्वांना सोबत घेत काम केले आहे. मी वर्ल्ड अ‍ॅक्वेटिक्स फेडरेशनवर गेल्यानंतर आता ११ अ‍ॅक्वेटिक चॅम्पियनशीप अहमदाबाद येथे होणार आहे. त्याची सुरुवात २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

कामत यांच्या संधीचा गोव्याला फायदा व्हावा : तिंबलो

उद्योजक अवधूत तिंबलो यांनी सांगितले की, बॅडमिंटन असोसिएशन व इतरही खेळांच्या निमित्ताने दिगंबर कामत यांच्यासोबत काम करता आले. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. जलतरणात भारताला जागतिक स्तरावर आणावे, ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यासाठी कार्य करावे. त्यांना मिळालेल्या या संधीचा फायदा गोव्यालाही व्हावा.      

हेही वाचा