कोमुनिदाद : टोम्बो वहीची पाने फाडून संशयितांनी ही जमीन केली हडप
म्हापसा : आसगाव कोमुनिदादच्या मालकीच्या एकूण १.६४ लाख चौरस मीटर जमिनीवर बनावट पोर्तुगीज कालीन दस्ताऐवज, टोम्बो वहीची पाने फाडून, कागदपत्रांमध्ये फेरफार करून हडप करण्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या फसवणुकीत चार स्वतंत्र मालमत्तांचा समावेश असून, संबंधित संशयितांविरुद्ध सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी कोमुनिदाद अटर्नी नेल्सन फर्नांडिस यांनी केली.
म्हापसा येथील कोमुनिदाद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष रुईल्दो डिसोझा, इआन डिसोझा, जेराल्ड डिसोझा व अॅड. अभिजीत नाईक उपस्थित होते.
आसगाव येथील १ लाख चौरस मीटर जमीन संशयित सुदेश पार्सेकर व सुप्रिया यांनी दस्ताऐवजांत फेरफार करून बळकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कोमुनिदादने मार्च २०२३ मध्ये एसआयटीकडे तक्रार दाखल केली.
आसगाव येथील १८,६०० चौरस मीटर जमीन संशयित वनिता व शिवशंकर मयेकर यांनी फसवणूक करून लाटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दानधर्माने अभियांत्रिक विद्यालयाला देण्यात आलेल्या ३,८२५ चौरस मीटर जमिनीवर खोटा दावा करून विद्यालयाविरुद्ध तक्रार दाखल केली.
आसगाव येथील ५,२६० चौरस मीटर जमीन प्रकरणात संशयित यशवंत सावंत, मिनाक्षी व इतरांनी कोमुनिदादचे नावच सर्व्हे क्रमांकातून कथितरीत्या काढून टाकले. याला कोमुनिदादने उपनिबंधकांकडे म्युटेशन प्रक्रियेत विरोध केला आहे. ४४,७४० चौरस मीटर जमीन संशयित यशवंत सावंत यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला.
फर्नांडिस यांनी सांगितले की, पोर्तुगीज काळातील टोम्बो वहीतील एक पान गायब आहे. एसआयटी चौकशीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. गायब पानाचा आधार घेत संशयितांनी जागा स्वतःची असल्याचे खोटे दावे केले.
२०१९ नंतर मी पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रकार माझ्या लक्षात आला. वहीची चावी कारकूनकडे असून पाने कशा प्रकारे गायब झाली, याचा शोध तपास यंत्रणांनी घ्यावा, असे फर्नांडिस म्हणाले.
टोम्बो वही एसआयटीकडे सुपूर्द केली असून, सर्व मजकूर पोर्तुगीज भाषेत आहे. काही खोटे दस्ताऐवजही तयार करून त्यावर खोटे हस्ताक्षर केल्याचे फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सिद्ध केले असल्याचा दावा फर्नांडिस यांनी केला.
न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास
आसगाव कोमुनिदादची जमीन ही केवळ कोमुनिदादची आहे. तिसऱ्या व्यक्तीला दाव्याचा अधिकार नाही. तरीही संशयितांशी हातमिळवणी करून कोणी जमीन खरेदी केली तर त्यांनाच आर्थिक फटका बसेल, असा इशारा फर्नांडिस यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले की, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तपासातून न्याय न मिळाल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार. ईडीने या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली असून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य देणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.