सर्वांवर माया करणाऱ्या अलकाताई थोड्याच दिवसात सर्व चाळीच्या 'अम्मा' झाल्या. त्यांचा मुलगा संजू त्यांना 'अम्मा' म्हणत असे. मग काही ठरावीक लोक सोडून नवीन पिढी त्यांना 'अम्मा' म्हणू लागली. खरोखर अम्माच त्या.
नवीन संसाराला लागले. थोडी भीती, तर थोडा बिनधास्तपणा अशा संमिश्र भावना. बिनधास्तपणा अशासाठी, की खरंच मला सासर चांगले मिळाले. घर-दार, आई-वडील, सर्व सोडून जवळजवळ एक दिवसाचा प्रवास होईल इतक्या लांब आले मी. पण घरात सहकार्याचे वातावरण. त्यात नात्यात असल्याने तसा मोकळेपणा, थोडा नवथरपणा. भीती थोडी वाटायचीच, कारण संस्कृती, त्यात मुळातच ज्या नगरीविषयी काहीबाही ऐकले होते अशा ठिकाणी संसार करायचा.. जमेल की नाही, होईल की नाही; आपली भाषा, रीती-रिवाज आणि खूप काही.
घरात तशा सासूबाई होत्या हो सांभाळणाऱ्या. सासरे आमचे सतत मित्र, गाणी आणि वाचन यात मग्न. मिस्टर नोकरीला. खरंच, एखाद्या मैत्रिणीची, सखीची गरज होती. समवयस्क दाद देणारी, शिकवणारी वगैरे. प्रत्येक गोष्ट सासूबाईंना विचारून करणे तसे पटतही नव्हते मनाला. प्रश्न इगोचा नव्हता, पण म्हणतात ना दोन पिढ्यांमध्ये तसा जरा फरकच असतो, असो!
माझा गृहप्रवेश झाला त्या वेळेस, आम्ही मुंबईला यायच्या वेळेस घरात गृहप्रवेशाची तसेच माप ओलांडण्याच्या विधीची तयारी सर्व शेजाऱ्यांनी केली. शेजारी म्हणजे आमच्या वरच्या मजल्यावरच्या पराडकर कुटुंबाने. पहिल्याच दिवशी जुजबी ओळख झाली माझी. चार-पाच माणसांचे कुटुंब पण त्यात लक्ष वेधून घेतले ते अलकाताईंनी. पुणेरी पराडकर जरा वेगळी अशी कर्नाटकी पद्धतीची साडी, लांबसडक काळेभोर केस. जणू कोणीतरी प्रेमाने जपणूक केल्यासारखे. केसात वेणी आणि चेहऱ्यावर निर्मळ हास्य. चला, म्हटले कोणीतरी आहे आपल्याच वयाचे.
आमची अलकाताई तशी माहेरहून धारवाडकर. अगदी ब्राह्मणी कानडी संस्कार घेऊनच पुणेरी पराडकर परिवारात आलेली, त्यांच्या अनंताची पत्नी. थोड्याच दिवसांत घट्ट मैत्री झाली आमची. वयात फारसा फरक नाही तसेच लग्नही एक वर्षाच्या फरकानेच झालेले, छान जोडी जमली. अलकाताई मात्र भाषेने जरी मराठी तरी कानडी संस्कार झालेली. त्यामुळे भाषा तशी हेल काढूनच. खूप गोड वाटायचे ऐकायला. साधे हाक मारणे ते पण नादमयच अगदी. एक गोष्ट सांगू, खरंच काही कारणाने मन चलबिचल झाले, घरची आठवण आली ना की मी सरळ अलकाताईकडे जाऊन बसे. एक खुबी होती तिच्याकडे, मन वाचायची. अगदी मनकवडी म्हणा ना! वयाने तशी लहानच मी पण एखाद्या मोठ्या बहिणीसारखी उभी असे ती माझ्या मागे. अलकाताईंच्या येण्याने पराडकरांच्या घरात अनेक कानडी पदार्थांची एंट्री झाली. रोज वरण-भात खाणारा अनंत सांबार-भात पण चेंज म्हणून आवडीने खाऊ लागला. अहो, आप्पे करावे तर अलकाताईने खास माहेरहून आप्पे करायचे बिडाचे पात्र घेऊन आली होती. कधी नारळाचा रस घालून तर कधी वेगवेगळ्या चटण्यांबरोबर. मजा यायची. त्यात पराडकर आजीचा स्वभाव पुणेरी असूनही दिलदार. सुनेच्या हातची चव शेजाऱ्यांनी चाखल्याशिवाय त्यांचे पोट भरत नव्हते. जेवणात एकही पदार्थ उरणार नाही असे तोलून-मापून स्वयंपाक अलकाताईंचा. हे एकच शास्त्र मला कधीच जमले नाही. मी खरंच कबूल करते. बाकी पाकशास्त्रात मी निपुण झाले ते अलकाताईंच्या कृपेनेच. मांसाहार आमचा हातखंडा पण शाकाहारात अळूचे फतफते आणि केळफुलाची भाजी याच्यापुढे मजल नव्हती माझी. सणासुदीला तर अलकाताईंचा साज-शृंगार पाहण्यासारखा असे. माहेरहून तसे भरपूर सोने घेऊन आलेली, अलकाताईंच्या गौरवर्णावर ते दागिने खुलूनही दिसत. दिवाळीत पराडकरांच्या दारात रोज नवीन रांगोळी असे. एवढी सुंदर की पुसून टाकूच नये असे वाटे. अहो, आमच्या चाळीचा स्वयंभू रखवालदार मोती कुत्रासुद्धा त्या रांगोळीपासून दूर राहत असे. कधीच खराब केली नाही त्याने. त्याला काय कळत होते माहीत नाही, पण असतो एखाद्याचा हातगुण. शेजारी आंबेकर यांच्याकडे पाच दिवस गणपती बाप्पा येत. रोज नवनवीन कार्यक्रम. ताईंना प्रचंड आवड गाण्याची. शिकल्याही असाव्यात पण कधी सांगितले नाही. कानडी भजन फार सुरेल म्हणत आंबेकर यांच्याकडे गणपतीत. उंदराळू हा नारळापासून बनवलेला पदार्थ त्या गणपतीत करत, खूपच चविष्ट.
सर्वांवर माया करणाऱ्या अलकाताई थोड्याच दिवसात सर्व चाळीच्या 'अम्मा' झाल्या. त्यांचा मुलगा संजू त्यांना 'अम्मा' म्हणत असे. मग काही ठरावीक लोक सोडून नवीन पिढी त्यांना 'अम्मा' म्हणू लागली. खरोखर अम्माच त्या. अहो, चाळीचा रामा गडी-म्हद्या आजारी पडला तर अलकाताई स्वतः आपल्या खर्चाने डॉक्टर आणायच्या. हा म्हद्या लोकांना मोठा शहाणपणा सांगे पण अम्मासमोर म्याव. प्रेमयुक्त दरारा कसा असतो याचे उदाहरण म्हणजे अलकाताई. खरं सांगू, खूप शिकले मी त्यांच्याकडे. पुढच्या वाटचालीत खूप फायदा झाला मला. वयानुसार आता अलकाताई ऊर्फ अम्मा म्हाताऱ्या झाल्या आहेत. मुलाने संजूने वांद्रे येथे जागा घेतली आहे पण जात नाहीत. चाळीतच जीव रमतो म्हणतात. दरवाजा बंद हा प्रकारच माहीत नाही हो त्यांना. धारवाडच्या संयुक्त कुटुंबातून येऊन गडबडीच्या गिरगावात संसार केलेल्या अलकाताई थोड्याच रमणार फ्लॅटमध्ये. सध्या गल्लीतल्या देवळाचा कारभार आहे त्यांच्याकडे. मस्त चालू आहे. अहो, चालणारच, मनच स्वच्छ आणि मस्त आहे ना...