ती तुमच्यापासून दूर गेली! स्त्रीवर बोलावे तेवढे कमीच...

स्त्रीवर बोलावे तेवढे कमीच. म्हटले जाते की, स्त्री ही स्वावलंबी झाली आहे. पण ते फक्त बोलण्यापुरतेच. खरे आयुष्य जगताना तर तिला पावलोपावली यातना भोगाव्या लागतात.

Story: लेखणी |
8 hours ago
ती तुमच्यापासून दूर गेली!  स्त्रीवर बोलावे तेवढे कमीच...

ती हसते, ती बडबडते तोपर्यंत तुमची... जेव्हा ती गप्प झाली, तेव्हा समजून जा की, ती तुमच्यापासून दूर गेली!

तो अथांग सागर, रेतीत पाय रुतून बसलेली मी, त्या क्षितिजाकडे एकटक लावून असलेली माझी नजर आणि मनात चाललेला गुंता. आजूबाजूला चाललेल्या गोंधळाची जाणीवही मला होत नव्हती. तो लाल वेष परिधान केलेला सूर्य जणू मला माझ्या प्रश्नांची उत्तरे देत होता. कधी हसून, कधी गोंधळून, तर कधी नाइलाज म्हणून. पण त्याला उत्तर देणे मात्र भागच होते, कारण तो कर्तव्याने बांधला होता. एका प्रश्नाचे उत्तर मात्र तो देऊ शकला नाही. गोंधळला, भांबावला, नजर चुकवत होता. कदाचित त्याच्याकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर नसावे, किंवा लज्जेपोटी तो गप्प असावा. प्रश्न सरळ आणि सोपा होता, पण जेवढा सोपा प्रश्न, तेवढेच कठीण उत्तर, कारण या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नव्हते.

प्रश्न होता तिच्या अस्तित्वाचा. स्त्री हे देवीचे रूप, आदिशक्ती, आदिमाया मानली जाते. प्रत्येक क्षेत्रात ती आपले काम योग्य रीतीने मांडण्याचा प्रयत्न करत असते. वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका निभावत असते. कधी आई, कधी बायको, कधी सून, कधी मुलगी आणि आणखी कितीतरी. सकाळी सर्वात आधी उठणारी आई सर्वात शेवटी झोपते आणि हे सगळे करत असताना ती कुठेही कमी पडत नाही. आणि कुठे कमी पडलीच तर तिचे जगणे कठीण करून सोडतात.

स्त्रीवर बोलावे तेवढे कमीच. म्हटले जाते की, स्त्री ही स्वावलंबी झाली आहे. पण ते फक्त बोलण्यापुरतेच. खरे आयुष्य जगताना तर तिला पावलोपावली यातना भोगाव्या लागतात. त्याचे काय... अहो, कुठल्या स्वावलंबनाबद्दल बोलतोय आपण? घराबाहेर पडून पैसे कमावणे म्हणजे स्वावलंबन? अहो ती तर गरज आहे. माझ्या मते, स्त्रीचे स्वावलंब तर तेव्हा खरे असेल जेव्हा आपण तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू. अहो, एक बाई काय करत नसते? घरासाठी, संसारासाठी, पण तिची जागा नेमकी कुठे असते? दर महिन्याला मासिक पाळीद्वारे स्त्रीत्व सिद्ध करत असते. तरीही ती अशुद्ध मानली जाते, देवापासून तिला दूर ठेवले जाते. मासिक पाळीद्वारे ती आपल्या मातृत्वाची ग्वाही देत असते. प्रत्येक घरात तिची पूजा झाली पाहिजे.

स्त्री म्हणून जगताना तिला पावलोपावली परीक्षा द्यावी लागते. पुढे टाकणारे प्रत्येक पाऊल विचार करून टाकावे लागते. कोणी काही म्हणणार नाही ना? याचा शंभर वेळा विचार करावा लागतो. कोणाशी मन मोकळेपणाने बोलू शकत नाही. कोणाकडे व्यक्त होऊ शकत नाही. अहो, दोन शब्द बोलली असेल एखाद्या मित्राबरोबर, केले असेल मन मोकळे एखाद्याकडे, पण नाही! आपण तिच्या चारित्र्याचा निकाल लावून मोकळे होतो. कुठल्यातरी एखाद्या बाईची तुलना आपण हजारो बायकांशी का करावी? असेल एखादी बाई वाईट म्हणून सगळ्या बायकांचा निष्कर्ष का काढावा?

का छाटतात पंख तिचे? घेऊ द्या तिला उंच भरारी. उडू द्या तिला स्वच्छंदीपणे. तिच्या असण्याने तुम्ही त्रस्त होता, पण तिच्या नसण्याने तुम्ही होरपळून जाल, तेवढे मात्र नक्की. आयुष्य फार लहान आहे. जगू द्या तिला. उडू द्या तिला.


शीतल सराफ