वृद्धत्व म्हणजे जणू दुसरं बालपण

वृद्धत्वाला प्रॉब्लेम म्हणून न पाहता दुसरं बालपण म्हणून स्वीकारायचं. फरक एवढाच, की पहिल्या बालपणात आपल्याला आईबाबांनी संयमाने घडवलेलं असतं आणि दुसऱ्या बालपणात आपल्याला त्यांचा हात धरून त्यांना जगायला शिकवावं लागतं.

Story: मनी मानसी |
8 hours ago
वृद्धत्व म्हणजे जणू दुसरं बालपण

‘वृद्धत्व म्हणजे जणू दुसरं बालपण’ हे आपण साऱ्यांनी ऐकलंय. पण खरं सांगायचं तर, हे दुसरं बालपण सांभाळताना मात्र आपण नापास ठरतो. कारण पोटच्या मुलाला जसे लाडाने, संयमाने वाढवतात, तसेच आपल्या वृद्ध पालकांना, आजी आजोबांना तितके सहजपणे झेलणे आणि जपणे आपल्याला जमत नाही. 

का बरं असं होतं?

आपण लहान होतो तेव्हा आई-वडील आपल्याला अंगा-खांद्यावर घेऊन खेळवायचे. त्यांचा श्वास जड झाला तरी आपल्या खट्याळ मागण्यांना उत्तर देत राहायचे. परंतु आज तेच आपले आई-वडील त्यांच्या जीवनाच्या सांध्यकाळात आहेत. शरीर साथ देत नाही, आठवणी तुटक होतात, आवाजात आणि स्वभावात एक हट्टीपणा येतो आणि इथेच आपली एक पाल्य म्हणून खरी परीक्षा सुरू होते. आजी-आजोबा खरंच बोरिंग असतात का? की आपण त्यांना समजण्यात कमी पडतोय? पालक खरंच आपल्याला समजून घेत नाहीत का? की आपणच त्यांच्या गरजांच्या भाषेत बोलायला शिकलेलो नाही?

त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याकडून चुकते कुठे? 

“ते कंटाळवाणं बोलतात” असं जे आपल्याला वाटतं ते खरंच आहे का, की आपणच त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची कला विसरलो आहोत? 

“ते आपल्याला समजून घेत नाहीत” असं आपण म्हणतो, पण खरं म्हणजे त्यांच्या जगण्याच्या तालाला आपल्या गतीचा स्पर्शच मिळालेला नाही.

आज पिढ्यान् पिढ्यांचा संवाद इथेच तर अडकतो.

ते पत्रातून जगले; आपण WhatsApp वर.

त्यांनी रेडिओवरचे गाणे मनात जपले; आपण Spotify वर स्कीप केलं.

ते हळूहळू वयाच्या अनुभवांतून शहाणे झाले; आपण Google सर्चने.

आणि या वेगळ्या गतींमध्ये संवादातला तुटकपणा आपल्याला आणि त्यांना दोघांनाही क्लेशदायक होतो.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर, वृद्धत्वात अवलंबित्व वाढतं. बालपणासारखं चिडचिड, हट्ट, किंवा लक्ष वेधून घेण्याची गरज त्यांना जाणवते. पण आपली पिढी मात्र “स्वावलंबन” या मंत्राखाली वाढलेली. त्यामुळेच दोन्ही बाजूंच्या अपेक्षा धडकतात आणि नात्याला ओरखडे पडतात. उदा. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेली गोष्ट आठवते. ती म्हणते, "माझी आई रोज सकाळी नाश्त्याला काय हवे, यावरून प्रश्न विचारून भंडावून सोडायची. मग त्यावरून आमचे वाद देखील व्हायचे. मला वाटायचं ती मुद्दामच हट्ट करते. पण नंतर लक्षात आलं गं, की अशा प्रश्नांतून तिला कटकट नाही, तर दिवसभरातल्या एकटेपणामुळे कंटाळून गेलेल्या तिला, थोडं लक्ष, थोड्या संवादाची संधी हवी असायची. वाद घालत का असेना पण पोर आपल्यासोबत वेळ घालवेल जरा ह्या उद्देशाने...

ही गोष्ट ऐकताना साश्रू नयनांनी, मला जाणवलं, की वृद्धत्वात माणूस मुलांसारखा होतो, पण आपण मात्र त्यांना मोठ्यांच्या मापानेच मोजत राहतो.

पण मग उपाय काय?

इथेच रिव्हर्स पॅरेंटिंग ह्या संकल्पनेचा उपयोग होतो. म्हणजे आपण त्यांचे पालक व्हायचं. त्यांच्या छोट्या रागातला हट्ट ओळखायचा, त्यांच्या भीतीतली असुरक्षितता समजून घ्यायची. त्यांच्या वारंवार विचारलेल्या प्रश्नाला कंटाळा न करता उत्तर द्यायचं. जसा त्यांनी आपल्याला ‘का-का’ विचारताना संयमाने समजावलं होतं, तसंच आपण करायचं. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या हट्टांसकट आपल्याला सांभाळलं, त्याच धीराने आपणही त्यांना हात द्यायचा.

पण हे करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. त्यांचा अवमान न करता त्यांना आधार द्यायचा. कारण पालकपणाची जबाबदारी जरी आपण घेतली तरीही, त्यांना त्यांच्या जगण्याचं स्वातंत्र्य हवंच असतं. शेवटी, वृद्धत्वाला प्रॉब्लेम म्हणून न पाहता दुसरं बालपण म्हणून स्वीकारायचं. फरक एवढाच, की पहिल्या बालपणात आपल्याला आईबाबांनी संयमाने घडवलेलं असतं आणि दुसऱ्या बालपणात आपल्याला त्यांचा हात धरून त्यांना जगायला शिकवावं लागतं.

काही साधे, पण उपयुक्त मार्ग 

️ऐकून घेणं: कधी कधी त्यांना सल्ला नको असतो, फक्त श्रोता हवा असतो.
धीर देणं: वयाबरोबर असुरक्षितता वाढते. "मी आहे" हे वाक्य त्यांच्यासाठी औषधासारखं असतं.
छोट्या छोट्या निर्णयांत सहभागी करून घेणं: मग तो डिनर मेन्यू असो किंवा घरचा कार्यक्रम, त्यांचा सल्ला विचारणं गरजेचं. कारण निव्वळ “तुम्हाला काहीच कळत नाही” म्हणणं म्हणजे त्यांची अस्तित्वाची भावनाच हिरावून घेण्यासारखं आहे. 
तंत्रज्ञान शिकवणं: पण उपहास न करता. जसं आपण एका लहान मुलाला पहिल्यांदा सायकल शिकवतो, तसंच. मोबाईलवर व्हिडिओ कॉल, फोटो शेअर करणं, यातून त्यांचा एकटेपणा कमी होतो.


मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४