एक झपाटलेला क्रिकेटप्रेमी शशिकांत झारापकर

‘क्रिकेट’, अखंड भारतात माझ्या मते तरी एक सुद्धा नागरिक नसेल की त्याला क्रिकेट माहिती नाही. अर्थात खेळता येत नसेल पण माहिती नक्कीच. खरंच भारतीयांच्या नसानसात भिनलाय हा प्रकार. तसे मूळ भारतीय खेळ अनेक पण त्यांना बाजूला सारून हा आंग्लाळू क्रीडाप्रेमींच्या हृदयात घर करून बसला हे मात्र नक्की.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
26th September, 09:52 pm
एक झपाटलेला क्रिकेटप्रेमी शशिकांत झारापकर

आमचा गोवा पूर्वी पोर्तुगीज अमलाखाली होता. त्यामुळे फुटबॉल तसा फेमस. मैदानी खेळ असल्याने अनेक तरुण आकर्षित होत. शाळा, कॉलेजमध्ये फुटबॉल टीम असत. पण वर्तमान पत्रे, गावी येणारे मुंबईकर, नंतर आलेला टी.व्ही.याद्वारे गोवेकरांना हळूहळू क्रिकेटची माहिती होवू लागली. माझे लग्न झाले त्यावेळेस निदान मला तरी क्रिकेटची एवढीच कल्पना होती की हा एक मैदानी खेळ आहे आणि त्याला बॅट बॉल असेही म्हणतात. असो!

आता मूळ विषयाकडे वळूयात. गिरगावात चाळीत आमच्या दोन खोल्या होत्या. एकात आम्ही म्हणजे आमचे सासू-सासरे व परिवार आणि बाजूच्या खोलीत माझ्या सासऱ्यांचे दोन बंधू जे अविवाहित होते ते राहत. माझे यजमान बऱ्याचदा काकांकडे जाऊन बसत. तसेच अनेक लोकही येत असत त्यांच्याकडे. मी तशी नवीनच पण दोन काकांपैकी धाकटे शशिकांत यांच्यात काहीतरी वेगळेपण जाणवे. तशी कृश शरीरयष्टी, सावळा वर्ण, पण डोळे अतिशय बोलके आणि भरदार आवाज. काका बँकेत कामाला होते. एकदा त्यांच्या खोलीत गेले साफसफाई करणाऱ्या बाईला घेऊन, तर काय! सगळी मासिकं, पेपर्सचे साम्राज्यच आणि विषय एकच ‘क्रिकेट’.

काका घरी नव्हते मी सगळा पसारा आवरला. नीट ठेवला. संध्याकाळी काका घरी आल्यावर त्यांना कळले की आपल्या खजिन्याला कोणीतरी हात लावला आहे. पण खूष झाले. मग काय जमली आमची गट्टी. तसे भयंकर बोलके ते. अनेक विषयांत गती त्यांना, पण क्रिकेट म्हणजे जणू आत्मा त्यांचा. तुम्हाला माहितीये त्यांच्या एवढुश्या खोलीत दोन मोठ्ठे रेडिओ, दोन बुशचे पॉकेट ट्राझिस्टर्स होते. कारण काय तर कॉमेन्ट्री चालू असताना एक बिघडला तर खंड नको दुसरा रेडी.

अहो मुंबईत येऊन फार फार तर सुनील गावस्करपर्यंत पोचलेली मी कुठे आणि ब्रॅडमनबद्दल अधिकार वाणीने बोलणारे काका कुठे? खरंच प्रचंड माहितीचा स्त्रोत होता तो. खूप लोक, पत्रकार वगैरे यायचे त्यांच्याकडे. क्रिकेटचे रेकॉर्डस विचारायला. तोंडपाठ अगदी. अहो कॉम्पुटर आत्ता आला हो, पण आमचे शाशिकाका क्रिकेचे सुपर कॉम्पुटर अगदी. आमचे सासरे हे त्यांचे मोठे बंधू, खूप कौतुक त्यांना भावाचे. त्यांनी जमवलेल्या प्रसिद्ध खेळाडूंच्या फोटोंचे दोन मोठ्ठे अल्बमसुद्धा बनवले होते दोघांनी मिळून. खोटे वाटेल तुम्हाला पण एक अल्बम उचलायला एक जण लागत असे. मी स्वतः पाहिले आहे.

सासरे नेहमी सांगायचे भावाबद्दल. लहानपणी अभ्यास, इतर गोष्टीत फारसा रस नसलेला शशी क्रिकेट म्हटले की वेडा व्हायचा. घरात सगळे तसे हुशार पण खेळाविषयी इतकी आसक्ती फक्त शशीचीच. शाळा चुकवून पारसी, हिंदू जिमखान्यावर मॅच पाहणे आणि मग घरी मार खाणे हे नेहमीचेच. ‘फुकट गेला पोर’ म्हणून शेवटी वाऱ्यावर सोडलेला शशी, शशिकांत झारापकर कधी झाला ते कळलेच नाही. क्रिकेटबद्दलचे त्यांचे प्रेम व जमा केलेली प्रचंड माहिती याचा हळूहळू मुंबई क्रिकेट जगतात बोलबाला होवू लागला. त्यात तरुणपणातच त्यांनी संघटनेचे सदस्यत्वही घेतले होते. त्यामुळे त्यांच्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. मुंबईतील मोठमोठे क्रिकेट खेळाडू, समीक्षक, लेखक त्यांच्या रेकोर्ड्सचा उपयोग करू लागले. अर्थात काकांचीही ना नव्हतीच कधी. आपल्याकडे असलेले ज्ञान दिलखुलासपणे इतरांना दिले त्यांनी. खरंच एखाद्या विषयावर खरोखरच प्रेम असेल तर माणूस सतत त्यांच्या उन्नतीची स्वप्ने पाहतो तसे काहीसे होते त्यांचे.

बँकेची नोकरी तशी आरामाची पण त्यांचा जास्त वेळ आरामात पंख्याखाली बसण्यापेक्षा कडक उन्हात वानखेडे स्टेडियमवरच जास्त जात असे. त्यांच्या ह्या ज्ञानाची, आवडीची खरी पारख केली ती एका मोठ्ठ्या पारख्याने. विजय मर्चंट त्यांचें नाव. शाशिकाकांना खरे उजेडात आणले त्यांनी. मग काय बघायलाच नको पेपर काय, टीव्ही काय विचारू नका. आणि असा माणूस माझा सासरा म्हणून आमचीही कॉलर टाईट. तसे घरात असले तरी कटकट नसे त्यांची. समोर असेल ते खाल्ले, जेवले की बसले मॅच लावून. नाही तर गेले क्रिकेट अड्ड्यावर. त्यांच्या सारखेच अनेक क्रिकेटप्रेमी गिरगावात होते तेव्हा. एवढा मोठा माणूस पण सगळ्यांशी मिळून वागत असे. फक्त समोरच्याला क्रिकेटची गोडी पाहिजे ही अट.

प्रकृती तशी आधीच तोळामासा त्यात खाण्यापिण्याची तशी आबाळच. मग काय मधुमेह मैत्री करणारच. काकांचे तसेच झाले. पण तब्येतीकडे दुर्लक्ष. सकाळची गोळी घेतली का असे विचारल्यावर, “थांब जरा ही ओव्हर संपुदे मग घेतो”, अशी ठराविक उत्तरे. ओव्हर कधी संपतच नसे आणि ती कधी संपली माहिती आहे काका ह्या जगातून गेल्यानंतर. डायबेटिस वाढल्यावर हॉस्पिटलमध्येच गेले ते. फोन आल्यावर धावत रात्री आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या दिवशी डे नाईट मॅच होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया. ऐकली त्यांनी रेडिओवर. कपिलचे शतक अनुभवले त्यांनी आणि आनंदाने गेले ते त्यांच्या आराध्य दैवताला, डॉन ब्रॅडमनला भेटायला. तो पॉकेट रेडिओ अजूनही आहे माझ्याकडे एका झपाटलेल्याची आठवण म्हणून...


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.