त्याने बसमधून उतरताना घडलेली घटना कंडक्टरला सांगितली. कंडक्टर हसला आणि म्हणाला, “तू नवा वाटतोस.” त्याने श्यामला सांगितले की, त्याने पाहिलेली फेरी माणसांची नसून भुतांची होती. रात्री असली माणसांची फेरी निघत नाही.
काही वर्षांपूर्वी गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. जेव्हा सालाझारची हुकूमशाही सुरू झाली, तेव्हा रात्री सात वाजल्यानंतर कोणीही घराबाहेर पडायचे नाही असा कडक नियम लावण्यात आला. बहुतेक लोक त्याचे पालन करत होते, नाहीतर पोर्तुगीज पोलीस लोकांचा फार छळ करत असत.
काही वर्षांपूर्वी गोव्यातील काही व्यापारी दूरवर जात असत. असाच श्याम नावाचा एक व्यापारी डिचोलीहून जुन्या गोव्याला गेला होता. श्याम एक चांगला शेतकरीही होता. आपले गावठी जिन्नस जसे की उकडे तांदूळ, आमसुले, हळसांदे घेऊन तो जुन्या गोव्याला गेला होता. आज तो एकटाच गेला होता. इतर दिवशी त्याचा मित्र त्याच्यासोबत असायचा. श्याम चौथी पास होता. पस्तीस वर्षांचा हा तरुण हिशोबात खूप हुशार होता. लाखो रुपयांची गणिते तो तोंडी सोडवत असे. ते दिवस थंडीचे होते. फाल्गुन लागण्यापूर्वी सारा जुना माल संपवायचा असे श्यामने ठरवले होते. रोजच्याप्रमाणे उकडीची पेज, भाकरी आणि भाजी डब्यात घेऊन श्याम व्यापारासाठी गेला.
आज श्यामला चांगला 'गल्ला' जमला होता. पैशांची पोटली भरली होती आणि नेलेला बहुतेक माल खपला होता. फक्त हळसांद्यांच्या दोन 'पडी' राहिल्या होत्या. ती विकूनच परत जायचे असे त्याने ठरवले होते. दिवस चांगला गेला होता. आता कोणीतरी हे हळसांदे संध्याकाळपर्यंत घेईल, याची तो वाट बघत बसला होता. वाट पाहता पाहता कधी उशीर झाला, त्याला कळलेच नाही. तो बसस्थानकावर पोहोचला, तर बस आधीच सुटली होती. आता काय करायचे, हे त्याला सुचेना. हातात पैसे होते. राहिलेली अर्धी भाजी-भाकरी डब्यात होती, पण उशीर झाल्यामुळे घरी पोहोचायचे कोणतेही साधन नव्हते.
घरचे आपली वाट पाहत असतील या चिंतेने तो कावरा-बावरा झाला. तो तशीच वाट चालू लागला. चालत जाणे आज शक्य नव्हते. अंधारही पडत आला होता. पोर्तुगीज सैनिक गस्तीवर येतील आणि वाटेत सापडले तर बेदम मारतील याची चिंताही त्याच्या मनात होती. काय करावे त्याला सुचेना, कुठे जावे तेही कळेना. एवढ्यात त्याला एक जुने घर दिसले. ते जुने ख्रिश्चन लोकांचे घर दिसत होते. “कोण आहे का घरात?” असे त्याने विचारले, पण कोणीही उत्तर दिले नाही. घराचे दिवे पण बंद होते. ‘इथेच रात्र काढायची’ असे श्यामने ठरवले. डब्यात असलेली भाजी-भाकरी खाल्ली, पाणी प्यायला आणि डोक्याखाली हात ठेवून तो झोपला. त्याला कधी झोप लागली, ते कळलेसुद्धा नाही.
मध्यरात्र झाली असणार. त्याला ‘टणटण’ असा घंटेचा नाद ऐकू आला. त्याने डोळे उघडले आणि गेटमधून त्याची नजर रस्त्यावर गेली. रस्त्यात जे दृश्य दिसले, ते पाहून तो चकित झाला, पण गप्पच राहिला. त्याला दिसले की एक काळ्या कपड्यांमध्ये असलेला माणूस मोठी मेणबत्ती आणि हातात घंटा घेऊन चालत आहे आणि त्याच्यामागे सफेद कपड्यांमध्ये अनेक लोक नाचत आहेत. “ही कसली फेरी आहे?” असा प्रश्न त्याला पडला. या विचारातच त्याची झोप उडाली. त्यानंतर कुत्र्यांच्या भुंकण्याचा विचित्र आवाज आला. श्याम डोळे मिटून तसाच एका कुशीवर सकाळ होण्याची वाट पाहू लागला. त्याला घरची ओढ लागली होती.
सकाळी साडेसात वाजता त्याला बस मिळाली. बसमध्ये जास्त माणसं नव्हती. त्याने बसमधून उतरताना घडलेली घटना कंडक्टरला सांगितली. कंडक्टर हसला आणि म्हणाला, “तू नवा वाटतोस.” त्याने श्यामला सांगितले की, त्याने पाहिलेली फेरी माणसांची नसून भुतांची होती. रात्री असली माणसांची फेरी निघत नाही. गोव्यात पूर्वीच्या काळी ‘प्लेग’ मुळे खूप लोक मरण पावली होती. भीतीपोटी त्यांच्यावर प्लेगच्या दरम्यान योग्य अंत्यसंस्कार झाले नव्हते. हीच माणसे इथे रात्रीची दिसतात. हे ऐकताच श्यामच्या अंगावर शहारा आला. “हे परमेश्वरा, धन्य आहे की मी त्यांना हाक वगैरे दिली नाही,” असे तो म्हणाला. कंडक्टरला कळले की श्याम घाबरला आहे. त्याने श्यामला घरी जाऊन अंघोळ करायला, देवाला नमस्कार करायला आणि दिवा लावायला सांगितले. श्याम धावतच घरी गेला आणि दिवा लावून परमेश्वराचे आभार मानले.
- श्रुती नाईक परब