नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा सक्तीच्या आदेशावर फेरविचार करावा

शिक्षक संघटनेची न्यायालयात याचिका : गोव्यासहीत देशभरातील शिक्षकांचे न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे

Story: वेब न्यूज । गोवन वार्ता |
38 mins ago
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा सक्तीच्या आदेशावर फेरविचार करावा
  • नवी दिल्ली: शालेय ‌शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याचा सक्तीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांमागेच दिला होता. या आदेशाविरोधात शिक्षकांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. टीईटी उत्तीर्ण सक्तीच्या आदेशावर फेरविचार करावा, अशी विनंती करणारी याचिका अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालय आपल्याच आदेशावर आता काय निर्णय देते, याकडे गोव्यासहीत देशभरातील शिक्षक वाट पाहत आहेत. 

  • सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य असल्याचा आदेश जारी केल्यानंतर शिक्षकांमध्ये खळबळ माजली. या निर्णयामुळे लाखो शिक्षकांना आपली नोकरी धोक्यात येणार अशी भीती सतावू लागली.  आणि शिक्षक संघटनेने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. 

  • टीईटीची सक्ती आरटीई कायदा अंमलात आल्यावर भरती झालेल्या शिक्षकांना लागू होतो. नियमांनुसार टीईटी परीक्षेची सक्ती आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेल्या शिक्षकांना लागू होत नसल्याचे सरकार न्यायालयाच्या निदर्शनास आणू पाहत आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात पहिली ते आठवीपर्यंत शिकवत असलेल्या सर्व शिक्षकांनी (ज्या शिक्षकांची नोकरीतील पाच वर्षांपेक्षा जास्त वर्षे शिल्लक आहेत) दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे केले आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त वर्षे राहिलेल्या शिक्षकांना बढती हवी असल्यास टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या आदेशावरून गोव्यासहीत देशभरातील शिक्षकांमध्ये हलचल पसरली आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने टीईटी सक्तीच्या आपल्या आदेशावर फेरविचार करावा, अशी मागणी शिक्षकांनी न्यायालात दाखल केलेल्या याचिकेतून केली आहे. 
हेही वाचा