मुजफ्फरनगर:अस्थी विसर्जन करून परत येताना भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. एकाच कुटुंबातील सहा जण दगावले. भरधाव आलेल्या कारची धडक ट्रकला बसून हा अपघात घडला. उत्तरप्रदेश राज्यातील मुजफ्फरनगरमध्ये हा अपघात घडल्याने, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातात ठार झालेले हरियाणातील करनाल जिल्ह्यातील आहेत.
करनाल जिल्ह्यातील फरीदपूर गावातील सहा सदस्य या अपघातात ठार झाले. अस्थी विसर्जन करून ते परत येत होते. सकाळी ६ वाजण्याच्यासुमारास या कुटुंबाची भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रकला धडकली. आणि कारचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना समजताच त्यांनीही शोक व्यक्त केला.
अपघातात ठार झालेल्या कुटुंबातील प्रमुख महेंद्र जुनेजा यांचे तीन दिवसांपूर्वी कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यांच्या अस्थी घेऊन कुटुंब हरिद्वारला गेले होते. कार घेऊन हे कुटुंब गेले होते. त्यात महेंद्र यांची पत्नी मोनिका, पुत्र पीयुष, बहिणी अंजू व मोहिनी, चालक शिवा व इतर मिळून सहाजण होते. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रकला धडक बसली. त्यानंतर एकच आक्रोश सुरू झाला व कारमध्ये अडकलेले मदतीची याचना करू लागले. अपघातस्थळी असलेल्या लोकांनी जखमींना मदतीचा हात देत इस्पीतळात दाखल केले.
फरीदपुरातील या कुटुंबासाठी हा दुसरा मोठा धक्का होता. यापूर्वी महेंद्र यांचे निधन झाल्याने शोकमग्न असताना एकाच कुटुंबातील आणखी सहा जण मृत्यूमूखी पडल्याने दु:खाचे सावट पसरले आहे. फरीदपूर गाव दु:खाच्या छायेत आहे. पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. अपघात घडल्यानंतर चालक पळून गेला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. हरियाणा सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचे घोषित केले आहे.