सतना: 'डोळे बंद करा आणि ५१ आकडे मोजा, तुम्हाला देवीचे दर्शन होईल!'... दोन भामट्यांनी दिलेला हा सल्ला नायब तहसीलदाराच्या पत्नीला महागात पडला. डोळे उघडताच तिच्या अंगावरील सर्व दागिने गायब झाले होते आणि पायाखालची जमीन सरकली. मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतना जिल्ह्यातील नागौड शहरातील नायब तहसीलदार राजेंद्र मांझी यांच्या पत्नी विनिता मांझी यांना दोन अनोळखी तरुणांनी वाटेत अडवले. विशेष म्हणजे, हे दोन्ही तरुण सुटाबुटात होते आणि दुचाकीवरून आले होते. नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्यांनी विनिता यांना बोलण्यात गुंतवले.
चोरट्यांनी विनिता यांना देवीच्या दर्शनासाठी एक युक्ती सांगितली. त्यांनी विनिता यांना डोळे बंद करून ५१ पर्यंत आकडे मोजायला सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विनिता यांनी डोळे मिटले आणि आकडे मोजायला सुरुवात केली. याच संधीचा फायदा घेत, या भामट्यांनी विनिता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातली कर्णफुले आणि हातातील अंगठी हिसकावली आणि त्यांनी तिथून पळ काढला.
डोळे उघडताच, त्यांना धक्का बसला. आजूबाजूला त्या तरुणांचा मागमूसही नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विनिता यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.