मुंबई : धावत्या लोकल मधून फेकलेला नारळ डोक्यावर आदळला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th September, 10:17 am
मुंबई : धावत्या लोकल मधून फेकलेला नारळ डोक्यावर आदळला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: धावत्या लोकल ट्रेनमधून निर्माल्य म्हणून फेकलेला नारळ डोक्यावर आदळल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय भोईर असे मृत तरुणाचे नाव असून, ही धक्कादायक घटना वसईजवळ घडली. गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

संजय भोईर हा मूळचा नायगाव आणि भाईंदर खाडीच्या मध्यभागी असलेल्या पाणजू बेटावरील रहिवासी होता. गोरेगाव येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करायचा. शनिवारी फेरीबोट विलंबाने सुरू झाल्याने संजयने नायगाव-भाईंदर रेल्वे पुलावरून पायी जाण्याचा निर्णय घेतला. याच वेळी एका प्रवाशाने धावत्या लोकल ट्रेनमधून निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने एक नारळ फेकला. तो नारळ थेट संजयच्या डोक्याला लागला आणि तो गंभीर जखमी झाला. काहीकाळ संजय तेथेच निपचित पडून राहिला. 

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याला तात्काळ वसई येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या परिसरातील नागरिकांना जीवघेण्या प्रवासाचा सामना करावा लागतो. हवामान बदलामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे बोटसेवा बंद असल्यास, अनेक नागरिक नाइलाजाने रेल्वे पुलावरून धोकादायक प्रवास करतात. धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकल्यामुळे आतापर्यंत गावातील १० ते १२ जण जखमी झाले असल्याची माहिती येथील रहिवासी विलास भोईर यांनी दिली आहे. काही वर्षांपूर्वी संजयच्या आई-वडिलांचाही याच भागात बोट उलटून मृत्यू झाला होता. संजयच्या पश्चात आता फक्त त्याचा मोठा भाऊ कृणाल आहे.

हेही वाचा