बेळगाव : आठ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या : न्यायालयाने नराधमाला ठोठावला मृत्युदंड

७ वर्षांनी मिळाला पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th September, 02:23 pm
बेळगाव : आठ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या : न्यायालयाने नराधमाला ठोठावला मृत्युदंड

बेळगाव: एका ऐतिहासिक निकालात, बेळगाव जिल्हा पॉक्सो न्यायालयाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि तिची क्रूरपणे हत्या केल्याप्रकरणी एका २८ वर्षीय आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. भरतेश रावसाब मिरजी (वय २८, रा. परमानंदवाडी, रायबाग तालुका) असे या नराधमाचे नाव आहे.

ही हृदयद्रावक घटना १५ ऑक्टोबर २०१९ रोजी घडली होती. ८ वर्षीय मुलगी ही जवळच्या दुकानात गेली होती. यावेळी आरोपी भरतेशने तिला आपल्या घरात नेले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर तिचा खून करून तिच्या मृतदेहाला दगड बांधून विहिरीत फेकून दिले. श्वान पथकाच्या मदतीने केलेल्या शोध मोहिमेदरम्यान मुलीचा मृतदेह सापडला होता.

या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना, सरकारी वकिलांनी आरोपीच्या गुन्ह्याबद्दल कोणताही संशय राहणार नाही, अशा पद्धतीने पुरावे सादर केले. यात २० साक्षीदार, १०६ कागदपत्रे आणि २२ भौतिक पुरावे यांचा समावेश होता. हे सर्व पुरावे आरोपीच्या विरोधात होते. निकाल देताना न्यायाधीश सी.एम. पुष्पलथा यांनी मिरजीला फाशीची शिक्षा सुनावली, तसेच कायद्याच्या संबंधित कलमांखाली अतिरिक्त शिक्षा आणि दंडही ठोठावला. न्यायालयाने आरोपीला पीडितेच्या पालकांना १० लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही दिले आहेत. या खटल्यात राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील एल.व्ही. पाटील यांनी बाजू मांडली.

हेही वाचा