तिरुमला: देशातील एका सुप्रसिद्ध देवस्थानाच्या कारकुनाने तब्बल १०० कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेली तीस वर्षे मंदिरातील दानपेटीतील पैशांचा हिशेब ठेवण्याचे काम करणारा हा कारकून इतका श्रीमंत कसा झाला, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. अखेर, त्याचे कारनामे उघडकीस आले आणि हा मोठा घोटाळा समोर आला आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये हा प्रकार घडला असून, त्यामुळे येथील राजकारणही तापले आहे. १९९० साली, वयाच्या २० व्या वर्षी रवी कुमार नावाचा युवक पेन्डा ज्यंगर मठाचा कर्मचारी म्हणून रुजू झाला. त्यानंतर त्याला तिरुमाला येथील भगवान वेंकटेश्वर मंदिरात कारकुनी कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०२३ पर्यंत, म्हणजे वयाच्या ५४ वर्षांपर्यंत, रवी कुमार मंदिरात कारकून म्हणून कार्यरत होता. दररोज मंदिराच्या दानपेटीत जमा होणाऱ्या सुमारे ४ ते ६ कोटी रुपयांची मोजदाद करण्याचे काम तो करत होता. गेल्या तीन दशकांपासून तो कामावर वेळेवर येणे आणि वेळेवर घरी जाणे, असा नियमित दिनक्रम पाळत होता.त्याच्याकडे विदेशी मुद्रा सांभाळण्याचेही काम होते.
अशी उघड झाली चोरी
एप्रिल २०२३ मध्ये त्याच्या प्रामाणिकपणाचा बुरखा फाटला आणि सर्व प्रकरण उघडकीस आले. मंदिरातील एका सुरक्षा रक्षकाला रवी कुमारच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सुरक्षा रक्षकाने त्याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ १०० अमेरिकी डॉलर सापडले. यापूर्वीही, त्याला ७२ हजार अमेरिकी डॉलर घेऊन पळताना पकडण्यात आले होते आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध होते. मात्र, त्यावेळी या प्रकरणाचा योग्य तपास झाला नाही.
उच्च न्यायालयाने तपास सीआयडीकडे सोपवला
सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला. त्यानंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणातही खळबळ माजली. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देत सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पार्टीवर गंभीर आरोप केलेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रवी कुमार मंदिराच्या दानपेटीतून रोख रक्कम आणि विदेशी चलन चोरताना स्पष्टपणे दिसत होता. या १०० कोटींच्या मालमत्तेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.