ट्यूशनमधून येताना दोघे वाहत्या गटारीत पडले; लहानग्याला वाचवताना मोठ्या भावाचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th September, 10:20 am
ट्यूशनमधून येताना दोघे वाहत्या गटारीत पडले; लहानग्याला वाचवताना मोठ्या भावाचा मृत्यू

कोल्हापूर: आपल्या लहान भावाचा जीव वाचवण्यासाठी एका अकरा वर्षांच्या मुलास्वतःला पाण्यात झोकून दिल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरात घडली आहे. ट्यूशनमधून घरी परतताना दोन सख्खे भाऊ खेळता-खेळता वाहत्या गटारीत पडले. या घटनेत मोठ्या भावाचा मृत्यू झाला, तर लहान भावाचा जीव वाचवण्यात यश आले.

फुलेवाडी रिंग रोड परिसरात राहणारे केदार कांबळे (११) आणि जेम्स कांबळे (८) हे दोघे भाऊ ट्यूशनमधून घरी परतत होते. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे रस्त्यालगतची गटार तुडूंब भरून वाहत होती. खेळता-खेळता लहान भाऊ जेम्स अचानक गटारीत पडला आणि पाण्याच्या प्रवाहामुळे वाहू लागला. त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ केदारही क्षणाचाही विचार न करता गटारीत उतरला.

गटारीच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने दोघेही सुमारे ३० ते ३५ फूट वाहत गेले. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. पाण्याची खोली आणि वेग जास्त असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. त्यावेळी काही तरुणांनी सिमेंटचे पत्रे टाकून पाण्याचा प्रवाह कमी केला. त्याचवेळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले.

त्यानंतर दोघांनाही तात्काळ सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान केदार कांबळेचा मृत्यू झाला. तर, लहान भाऊ जेम्स बचावला. भावाच्या या बलिदानाने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा