कारवार : गोकर्ण गुहेत सापडलेली रशियन महिला व तिची मुले सुरक्षित मायदेशी

पर्यटन व्हिसावर भारतात आली होती

Story: प्रतिनिधी, गोवन वार्ता |
7 hours ago
कारवार : गोकर्ण गुहेत सापडलेली रशियन महिला व तिची मुले सुरक्षित मायदेशी

जोयडा : व्हिसाची मुदत संपल्यानंतरही कारवार जिल्ह्यातील गोकर्ण येथील डोंगरात एका गुहेत आपल्या दोन मुलांसह राहत असलेल्या रशियन महिला नीना कुटीना (४०) हिला गोकर्ण पोलिसांनी अखेर रशियात परत पाठवले आहे. तिची मुले प्रेया (६) आणि अमा (४) यांनाही सोबत रवाना करण्यात आले. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तिघांना रवाना करण्यात आले आहे. 

नीना कुटीना काही महिन्यांपूर्वी पर्यटन व्हिसावर भारतात आली होती. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती आपल्या दोन मुलींसह गोकर्ण परिसरातील  घनदाट जंगलात डोंगरावर असलेल्या एका गुहेत वास्तव्यास होती. पती डोर्श्लोमो गोल्डस्टाईन, जो रशियातच राहतो, याच्यासोबत काही वैयक्तिक मतभेदांमुळे ती भारतात मुलांसह थांबली होती. मात्र पतीने बंगळुरू उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून पत्नी व मुलांना परत मायदेशी पाठवण्याची मागणी केली होती.

अर्जावर सुनावणी घेऊन न्यायमूर्ती बी. एम. श्याम प्रसाद यांच्या खंडपीठाने चौकशी केली. त्यानंतर महिला व मुलांना रशियात परत पाठवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, गोकर्ण पोलिसांनी नीना व तिच्या मुलांची डीएनए तपासणी करून मुलं तिचीच असल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी रामतीर्थ अरण्यात गस्त घालताना पोलिसांना नीना व मुले गुहेत लपून बसलेली आढळली होती. त्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

आज रशियात दाखल

न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व शासकीय औपचारिकता पूर्ण करून अखेर नीना कुटीना व तिच्या मुलांना परत रशियात रवाना करण्यात आले. आज ते तिघेही सुखरूपपणे रशियात दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.