पुन्हा गोव्यात पिटाळण्याची शेतकऱ्यांची तयारी
पेडणे : गोव्याच्या हद्दीत धुमाकूळ घातल्यानंतर हत्ती (ओंकार) महाराष्ट्रातील सातोसे-मडुरे भागात दाखल झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी हत्तीला पुन्हा गोव्याच्या हद्दीत पिटाळून लावण्याची तयारी सुरू केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून ओंकार हत्तीने तांबोसे गावातून तेरेखोल नदी ओलांडून महाराष्ट्रातील मडुरे भागात प्रवेश केला आहे. सदर हत्तीने शेतकऱ्यांच्या शेती बागायतीला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवली आहे. या हत्तीला पुन्हा गोव्याच्या पेडणे तालुक्यात पिटाळण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन फटाके फोडून हत्तीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर गोव्याच्या वन खात्याचे कर्मचारी आणि अधिकारी अलीकडेच तेरेखोल नदी परिसरात ठाण मांडून बसले आहेत. हत्ती पुन्हा नदी ओलांडून पेडणे तालुक्यात येऊ नये यासाठी ते सतत लक्ष ठेवून आहेत.
मागील दहा-बारा दिवसांपासून ओंकारने कडशी, मोपा, तोरसे, तांबोसे आणि उगवे भागांत धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणावर शेतीची नासधूस केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उगवेत आज शेतकऱ्यांची बैठक
उगवे परिसरात हत्तींचा उच्छाद सुरू असल्याने ग्रामस्थ व शेतकरी संतापले आहेत. जोपर्यंत हत्ती इथून जात नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. यासाठी रविवारी (दि. २८) सकाळी १०.३० वा. श्री देवी माऊली मंदिर, उगवे येथे ग्रामस्थ व शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्याआधीच दुपारी ओंकार हत्ती महाराष्ट्रात निघून गेल्याची वार्ता पसरली.