‘मोपा’वरील टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नावर ३ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

आमदार सरदेसाई यांची माहिती : आंदोलनात आरजीचाही सहभाग


19 hours ago
‘मोपा’वरील टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नावर ३ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मोपा विमानतळावर टॅक्सीचे पार्किंग शुल्क वाढवण्याच्या प्रश्नासह अन्य प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत ३ ऑक्टोबर रोजी बैठक होईल. पार्किंग शुल्क वाढवल्याबद्दल टॅक्सीवाल्यांनी सोमवारी मोपा विमानतळावर आंदोलन केले. सायंकाळी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि आरजीचे मनोज परब यांच्यासह टॅक्सीवाल्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या बैठकीत ३ ऑक्टोबरला बैठक घेण्याचे ठरले, अशी माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.
मोपा विमानतळावर टॅक्सी पार्किंग शुल्क ८० वरून २१० रुपये केल्यामुळे टॅक्सीवाल्यांनी आंदोलन केले. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सायंकाळी आमदार सरदेसाई, परब यांच्यासोबत टॅक्सीवाल्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत पार्किंग शुल्कावर चर्चा झाली. मोपा विमानतळाचे अधिकारी, टॅक्सीवाले आणि संबंधितांची मुख्यमंत्री ३ ऑक्टोबरला बैठक घेतील. या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा होईल. तोपर्यंत पार्किंगची शुल्कवाढ होणार नाही. ३ ऑक्टोबरला निर्णय होईल, असे आमदार सरदेसाई यांनी बैठकीनंतर सांगितले.
पार्किंग शुल्क वाढवण्याचा निर्णय अन्यायकारक आहे, असे शिव वॉरियर्सचे अध्यक्ष रामा वरक यांनी सांगितले. आरजी पक्ष गोमंतकीयांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देतो. पेडणेच्या टॅक्सीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरजी पक्षान आंदोलनात भाग घेतला, असे मनोज परब यांनी सांगितले.


टॅक्सीवाल्यांचे नव्हे, व्यावसायिक पार्किंग शुल्क वाढवले
मोपा विमानतळावर खासगी टॅक्सीसाठीचे व्यावसायिक पार्किंग शुल्क वाढवले आहे. काऊंटरवरील टॅक्सीसाठीचे शुल्क वाढवलेले नाही. ही वाढ टॅक्सीवाल्यांना लागू नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. सर्व टॅक्सीवाल्यांनी काऊंटरवर येण्याची गरज आहे. मोपा विमानतळावरील ‘रेंट अ कॅब’ बंद केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.