देशभरात १५ ठिकाणी छापे; भारतीय, विदेशी चलन जप्त
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोव्यातील बिग डॅडी कॅसिनोसह, दिल्ली, मुंबई, राजकोट व इतर मिळून १५ ठिकाणी छापा टाकून २.२५ कोटी रुपये, १४ हजार यूएस डाॅलर आणि ८.५ लाख रुपये किमतीचे विदेशी चलन जप्त केले. ईडीने ही कारवाई ‘फेमा’ कायद्याअंतर्गत मागील दोन दिवस केली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिलेल्या माहितीनुसार, बिग डॅडी कॅसिनोत पोकर खेळाडू व्यवहार करण्यासाठी क्रिप्टो वॉलेटचा वापरत करत आहेत. तसेच विदेशी चलनाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, अशी माहिती गुप्तहेरांकडून मिळाली होती. याची दखल घेऊन ईडीचे अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ईडीने २८ आणि २९ सप्टेंबर रोजी गोव्यातील बिग डॅडी कॅसिनो, दिल्ली, मुंबई, राजकोट आणि इतर मिळून १५ ठिकाणी छापे मारले. त्यात ईडीने २.२ कोटी रुपये, १४ हजार यूएस डाॅलर, ८.५ लाख रुपये किमतीचे विदेशी चलन जप्त केले. याशिवाय ९० लाख यूएसडीटी क्रिप्टो चलन गोठविण्यात आले. तसेच ईडीने दस्तावेज तसेच इलेक्ट्रॅानिक यंत्रणा जप्त केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या दस्तावेजांची प्राथमिक छाननी केली असता, पोकर खेळाडू व्यवहार करण्यासाठी चिप्सची देवाण घेवाणीसाठी विदेशी चलनाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. तसेच कर्मचारी rolex777.co, iCasino247.com, play247s.com, Win Daddy, Poker Daddy व इतर ऑनलाईन कॅसिनो प्लॅटफॉर्म्सना प्रोत्साहन देत होते. संबंधित रक्कम दुबई तसेच इतर देशांत हस्तांतरण करण्यासाठी पोकर खेळाडूंच्या क्रिप्टो वॉलेटचा वापर होत होता. हवाला मार्फत (अंगडिया) नेटवर्क आणि यूएसडीटी क्रिप्टो ट्रान्स्फरचा वापर केला जात होता. पैसे जिंकण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी अनेक वेळा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
ईडीने वरील कारवाई गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा. लि., वर्ल्डवाईड रिसॉर्टस अॅण्ड एन्टरटेन्मेंट प्रा. लि. आणि बिग डॅडी कॅसिनो गोवा यांच्या १५ ठिकाणी ‘फेमा’ कायद्याअंतर्गत केली आहे.