ग्रामीण भागातील ५२ गावांपैकी ३० गावांमध्ये कार्यान्वित
पणजी : भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) सरव्यवस्थापक एल. बी. लाल यांनी गोव्यातील दूरसंचार सेवेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ४-जी टॉवर्स उभारणीसाठी निवडलेल्या ग्रामीण भागातील ५२ गावांपैकी ३० गावांमध्ये आता ४-जी सेवा कार्यरत झाली आहे. यासोबतच, १९१ ग्रामपंचायतींना भारत नेट प्रकल्पांतर्गत ऑप्टिकल फायबर इंटरनेट जोडणी देण्यात आली आहे, असे लाल यांनी सांगितले.
१ ऑक्टोबर रोजी बीएसएनएलला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोवा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत लाल यांनी बीएसएनएलच्या वाटचालीचा आढावा घेतला. १ ऑक्टोबर २००१ रोजी स्थापन झालेल्या बीएसएनएलने या २५ वर्षांच्या काळात अनेक चढ-उतार पाहिले. नोकरशाही प्रक्रिया, निधीची कमतरता आणि जुनाट तंत्रज्ञान यासारख्या मोठ्या अडचणींना बीएसएनएलला काही काळ सामोरे जावे लागले. मात्र, आता खासगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्याची वेळ आली आहे, असा विश्वास लाल यांनी व्यक्त केला.
सामाजिक बांधिलकीला प्राधान्य
खासगी कंपन्या मुख्यतः मेट्रो आणि मोठ्या शहरांत नफा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण बीएसएनएलने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा उपलब्ध करून दिली आहे. ईशान्य भारत आणि आदिवासी क्षेत्रांसारख्या फायदेशीर नसलेल्या ठिकाणीही सेवा देण्यासाठी बीएसएनएलने प्रयत्न केले आहेत, असे लाल यांनी सांगितले. गोव्यात लँडलाईन आणि मोबाईल जोडणी व्यतिरिक्त, बीएसएनएलने डिजिटल इंडिया निधी अंतर्गत ४-जी सॅच्युरेशन आणि भारत नेट हे दोन्ही प्रकल्प सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू ठेवले आहेत.
४-जी सॅच्युरेशन प्रकल्पाची प्रगती
ज्या ग्रामीण भागात जिओ आणि एअरटेलसारख्या खासगी कंपन्या पोहोचू शकल्या नाहीत, त्या भागात बीएसएनएलने ४-जी सॅच्युरेशन प्रकल्पांतर्गत मोबाईल सेवा सुरू केल्या. या प्रकल्पासाठी निवडलेल्या ५२ गावांपैकी आतापर्यंत ३० गावांमध्ये ४-जी टॉवर्स उभारले गेले आहेत. उर्वरित सर्व गावांमध्ये येत्या ३ ते ४ महिन्यांत ४-जी टॉवर्स सुरू होतील. काही गावांची भौगोलिक परिस्थिती, जागेची कमतरता आणि लोकांचा विरोध यामुळे टॉवर्स उभारणे एक आव्हान होते. महसूल, आयटी, वनविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने जागा उपलब्ध झाली. येत्या काळात गोव्यातील आणखी गावांचा या प्रकल्पात समावेश होईल, असे लाल म्हणाले.
भारत नेट प्रकल्पाचा विस्तार
भारत नेट प्रकल्पांतर्गत बीएसएनएलने राज्यातील एकूण १९१ ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर इंटरनेट जोडणी देण्याचे काम हाती घेतले आहे. अत्याधुनिक ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानावर आधारित १०० जीबी क्षमतेची जोडणी ग्रामीण भागांना देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण १५०० किलोमीटर फायबर टाकण्यात आले. ग्रामपंचायतींमधील घराघरांत फायबर कनेक्टिव्हिटी पोहोचविण्याचे काम टेलिकॉम इन्फ्रा प्रोव्हायडर्सद्वारे सुरू अशी माहिती लाल यांनी दिली.