वन्य जीव मंडळाची बैठक; भरपाईवाढीचा निर्णय
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत वनमंत्री विश्वजीत राणे, मुख्य सचिव डॉ. कांडावेलू, आमदार देविया राणे व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबियांना आत १० लाखांऐवजी १५ लाख रुपये नुकसानभरपाई पोटी मिळणार आहेत. वन्य जीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली वन्य जीव मंडळाची सोमवारी बैठक झाली.
वन खात्याच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली. या बैठकीला वनमंत्री विश्वजीत राणे, गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार डॉ. देविया राणे, मुख्य सचिव डॉ. कांडावेलू आणि वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्याला कायमस्वरूपी विकलांग वा अपंगत्व आल्यास त्याला साडेसात लाख रुपयांची भरपाई मिळेल. पूर्वी ही भरपाई ५ लाख रुपये मिळत होती. हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यास दोन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या लोकांना ५० हजार रुपयांची मदत मिळेल. यापूर्वी किरकोळ दुखापतीसाठी २५ हजार रुपयांची मदत मिळत होती. वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासह लोकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजण्याबाबत बैठकीत विचारविनिमय झाला, अशी माहितीही सूत्रांनी दिली.