दोघांना अटक : कोलवाळ पोलिसांकडून दोन फॉर्च्युनरही जप्त
कोलवाळ पोलिसांनी जप्त केलेल्या फॉच्युनर कार.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गोव्यातील नोंदणीकृत भाड्याच्या खासगी गाड्यांची नंबरप्लेट बदलून त्या गाड्या चोरणाऱ्या एका टोळीचा कोलवाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुजरातचा रहिवासी असलेल्या अगिरा रमणीकभाई आणि राजस्थानचा हरपित सिंग या संशयितांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी बनावट नंबरप्लेट लावलेल्या दोन आलिशान फॉर्च्युनर गाड्याही जप्त केल्या आहेत.
माडेल, थिवी येथील मांगिरीश कॉलनीमध्ये पोलिसांनी रविवारी रात्री १० च्या सुमारास ही कारवाई केली. संशयितांनी या गाड्या पणजी आणि म्हापसा येथून भाड्याने घेतल्या होत्या. या गाड्यांचे मालक कळंगुट आणि कांदोळी येथील आहेत. गाड्या भाड्याने घेताना संशयितांनी बनावट ओळखपत्रांचाही वापर केल्याचे समोर आले आहे.
माडेल थिवी येथे गोव्यातील नोंदणीकृत दोन गाड्यांना बनावट नंबरप्लेट लावल्या जात असल्याची माहिती कोलवाळ पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकून दोन्ही संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले. म्हापसा वाहतूक कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या या दोन्ही गाड्यांची नंबरप्लेट काढून त्या जागी ‘आरजे २३ यूएफ ६५००’ आणि ‘पीबी ०९ एएन ०६३०’ अशा बनावट नंबरप्लेट लावल्या होत्या. विशेष म्हणजे, या बनावट नंबरप्लेट ‘सिक्युरिटी नंबर प्लेट’प्रमाणे वाटत होत्या. पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघाही संशयितांना अटक केली आहे.
गाडी भाड्याने घेण्यासाठी वापरले बनावट ओळखपत्र
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते या गाड्या चोरून नेण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी गाड्यांच्या मालकांशी संपर्क साधला तेव्हा, त्यांनी या गाड्या भाड्याने दिल्याचे समजले. तसेच, संशयितांनी भाड्याने घेण्यासाठी सादर केलेली ओळखपत्रेही बनावट असल्याचे आढळून आले. आलिशान गाड्या भाड्याने घेऊन त्या चोरून नेणाऱ्या गुन्हेगारांची ही टोळी असावी, असा पोलिसांना संशय आहे.