नवी मुंबई: प्रेमासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या दोन पत्नींनी त्यांच्या पतींना जीवनदान देण्यासाठी एक अविश्वसनीय निर्णय घेतला. रक्तगट जुळत नसल्याने एकमेकांच्या पतींना यकृत दान करून त्यांनी प्राण वाचवले. नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये हा यशस्वी ‘स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट’ (swap liver transplant) करण्यात आला.
चिपळूण येथील ५३ वर्षीय महेंद्र गमरे आणि नांदेड येथील ४१ वर्षीय पवन ठिगळे हे दोघेही यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याने कावीळ, जलोदर, भूक न लागणे आणि अवयवांना सूज येणे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त होते. एका वर्षापेक्षा जास्त काळ ते प्रत्यारोपणाची (liver transplant) वाट पाहत होते आणि दिवसेंदिवस त्यांची प्रकृती अधिकच ढासळत चालली होती.
या परिस्थितीत त्यांच्या पत्नी यकृत दान करण्यास तयार होत्या, पण दुर्दैवाने त्यांचे रक्तगट पतींसोबत जुळत नव्हते. यावर उपाय म्हणून, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शरणकुमार नरुटे यांच्या टीमने त्यांना ‘स्वॅप प्रत्यारोपणा’चा सल्ला दिला. ‘स्वॅप प्रत्यारोपण’ म्हणजे अशा दोन कुटुंबांमध्ये अवयवांची देवाणघेवाण करणे, जिथे दात्याचा अवयव रक्तगट न जुळल्याने कुटुंबातील व्यक्तीला देता येत नाही.
यानुसार, महेंद्र गमरे यांच्या पत्नीने पवन ठिगळे यांना यकृताचा काही भाग दान केला, तर पवन यांच्या पत्नीने महेंद्र गमरे यांना यकृताचा भाग दिला. दोन्ही दाते आणि दोन्ही प्राप्तकर्ते यांच्यावर एकाच वेळी चार ऑपरेटिंग रूममध्ये १० तासांहून अधिक काळ ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. सर्व शस्त्रक्रिया एकाच वेळी पार पाडणे हे सर्वात मोठे आव्हान होते. कारण दोन्ही दाते आणि दोन्ही प्राप्तकर्ते यांची काळजी एकाच वेळी घ्यायची होती. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि दोन्ही रुग्णांचा जीव वाचला. शस्त्रक्रियेनंतर सात दिवसांत दात्यांना, तर अकरा दिवसांनी प्राप्तकर्त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
देशात अवयवदात्यांची संख्या कमी असल्याने, 'स्वॅप प्रत्यारोपण' ही अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या घटनेने अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले असून, रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी एक नवीन मार्ग खुला केला आहे.