३८ भारतीय बँकांचा गोपनीय डेटा लीक; लाखो खातेदारांच्या संवेदनशील माहितीला धोका

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th September, 12:14 pm
३८ भारतीय बँकांचा गोपनीय डेटा लीक; लाखो खातेदारांच्या संवेदनशील माहितीला धोका

मुंबई : एकीकडे मोबाईल आणि यूपीआय ॲप्स हॅक करून बँक खात्यांवर सातत्याने सायबर हल्ले होत असताना, आता थेट ३८ हून अधिक भारतीय बँकांचा गोपनीय डेटा लीक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे देशाच्या डिजिटल सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सायबर सुरक्षा रिसर्च फर्म अपगार्डच्या दाव्यानुसार, एका असुरक्षित क्लाउड सर्व्हरमुळे (Amazon S3) लाखो बँक ग्राहकांचे व्यवहार रेकॉर्ड उघड झाले आहेत. या लीक झालेल्या डेटा फाईल्समध्ये खातेदारांचे नाव, बँक खाते क्रमांक, व्यवहाराची रक्कम आणि संपर्क तपशील यांसारखी अत्यंत संवेदनशील माहिती उघड झाल्याचे म्हटले आहे. ऑगस्टच्या अखेरीस हा डेटा लीक झाला असून त्यात २.७३ लाख पीडीएफ फाईल्सचा समावेश आहे. या सर्व फाईल्स NACH (नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस) सिस्टीमशी संबंधित होत्या, ज्याचा वापर बँका मोठ्या प्रमाणावर पगार, कर्जाचे हप्ते आणि बिले भरण्यासाठी करतात.

या डेटा लीकबाबत अपगार्डने 'Aye Finance' या कंपनीचे नाव घेतले असून, त्यांना आणि एनपीसीआयला (NPCI) माहिती देऊनही सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत हा डेटा इंटरनेटवर खुलाच होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्यात रोज नव्या फाईल्स वाढत होत्या. अखेरीस CERT-In ला सूचना दिल्यानंतरच हा सर्व्हर सुरक्षित करण्यात आल्याचे अपगार्डने म्हटले आहे. दुसरीकडे, यावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) मात्र 'आमची सिस्टीम पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कोणताही डेटा लीक झालेला नाही,' असा दावा केला आहे.

या घटनेमुळे देशाच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. आपल्या गोपनीय माहितीचा गैरवापर होण्यापासून वाचवण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. यासोबतच, बँकिंग प्रणालीतील कमतरता दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज हा डेटा लीक दर्शवत आहे.


हेही वाचा