मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.
करूर: तमिळनाडूतील करूर येथे प्रसिद्ध अभिनेता व नुकतेच राजकारणात प्रवेश केलेल्या थलपती विजयच्या रॅलीत झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत आतापर्यंत तब्बल ४० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १६ महिला आणि १० मुलांचा समावेश असल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी दिली. या घटनेत ५१ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या रॅलीसाठी केवळ १० हजार लोकांची परवानगी असताना ५० हजारांहून अधिक लोक जमा झाल्याने ही दुर्घटना घडली.
ही भीषण चेंगराचेंगरी विजयच्या नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिराने येण्यामुळे झाली. सायंकाळी ७.४५ च्या सुमारास अचानक गर्दी वाढली आणि काही लोक विजयच्या बसकडे धावू लागले. त्याचवेळी विजयला व्यासपीठावर एका ९ वर्षांच्या मुलीच्या हरवल्याचे कळले. त्याने स्टेजवरून तिला शोधण्याचे आवाहन केले, ज्यामुळे गर्दीत गोंधळ वाढला आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. हवामानात वाढलेल्या आद्रतेमुळे आणि गरमीमुळे अनेक लोक बेशुद्ध पडले, तर अनेक मुले त्यांच्या कुटुंबीयांपासून वेगळी झाली. त्याच्यावरूनच लोक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपेक्षित गर्दीच्या दुप्पट लोक जमले असतानाही, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसे पोलीस किंवा स्वयंसेवक उपस्थित नव्हते, ज्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली.
घटनेनंतर तातडीने मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन रात्री उशिरा करूर येथे भेट दिली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. या अपघाताची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला असून, तामिळनाडू सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयानेही या घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.
दुर्घटनेनंतर अभिनेता विजय जखमींना भेटला नाही. तो चार्टर्ड विमानाने थेट चेन्नईला रवाना झाला. मात्र, त्याने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, ‘माझे हृदय तुटले आहे. मला खूप वेदना आणि दुःख होत आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि जखमींसाठी प्रार्थना करतो,’ असे लिहिले. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी नमक्कल येथे झालेल्या रॅलीतही विजयच्या उशिरा येण्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली होती आणि एका महिलेचा पाय मोडला होता.