पुणे : संसार करणे म्हणजे सोपा खेळ नाही. दोन परस्पर व्यक्तींनी एकत्र येऊन संसार मांडल्यानंतर कुरबुरी ही सुरू होतात. छोटी-मोठी प्रकरणे विकोपाला जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचतात. अशी प्रकरणे सध्या गोव्यासहीत देशात वाढत आहेत. अशाच एका घटस्फोटाची (Divorce) दखल घ्यावी लागते, कारण हा घटस्फोट खूपच महागडा ठरला आहे. केवळ ४५ दिवस संसार केल्यानंतर घटस्फोटाच्या प्रक्रियेत चक्क ४५ लाख रुपये पोटगीच्या स्वरूपात द्यावे लागले आहेत.
पुणे येथे ही महागड्या घटस्फोटाची घटना घडली. लग्नानंतर भांडण सुरू झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी आपल्याला घराबाहेर काढले, असा दावा करीत एका नवविवाहितेने आपला नवरा, सासरा, सासू तसेच नणंद यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसा केली जात असल्याची तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली. विवाहितेच्या सासरच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करून तपास केल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण न्यायालयापुढे आल्यानंतर विवाहितेची बाजू मांडणारे वकील ॲड. रेश्मा सोनार व ॲड. प्रियांका काटकर या दोघांनी पती-पत्नीचे समुपदेशन सुरू केले. त्यानंतर पतीने ४५ लाख रुपये एकरकमी पोटगी देण्यास तयार असल्याचे सांगितले. पत्नीही या तोडग्याला तयार झाली. पत्नीने पती व त्यांच्या कुटुंबियांविरोधात दाखल केलेला कौटुंबिक हिंसेचा आरोप मागे घेतला. त्यानंतर न्यायालयाने पती व कुटुंबाला आरोपमुक्त केले. त्यानंतर परस्पर संमतीने नवरा व बायकोने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर घटस्फोट ही मंजूर झाला. अशा पद्धतीने महागड्या ठरलेल्या या घटस्फोटाचा वाद शेवटी संपुष्टात आला.