१ जुलै, २०२५ पासून ही वाढ लागू होणार आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची विजयादशमी गोड झाली असून, दसऱ्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (DA increased) 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के एवढा झाला आहे. १ जुलै, २०२५ पासून ही वाढ लागू होणार आहे.
कर्मचाऱ्यांची थकबाकी दिवाळीपूर्वी त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारात जमा केली जाणार आहे. त्यात पगाराबरोबरच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या थकबाकीचा समावेश असणार आहे. पगारातही मोठी वाढ होणार असून, कर्मचारी, पेन्शन घेत असलेल्यांचा दसरा, दिवाळी ही मोठ्या उत्साहात जाणार आहे. या वाढीचा लाभ सातव्या वेतन आयोगाखाली येणारे केंद्रीय कर्मचारी, पेन्शन घेणारे व कुटुंब पेन्शनधारकांना होणार आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता व महागाई सवलती मध्ये झालेली ही वाढ मोठी आहे. या वर्षी महागाई भत्त्यात (D.A.) झालेली ही दुसरी वाढ आहे. कर्मचाऱ्यांना वर्षाला दोन वेळा सरकार महागाई भत्त्यात वाढ देत असते.