एमपी : नोकरी वाचवण्यासाठी शिक्षक पित्याने नवजात बाळाला जंगलात सोडले; वरून ठेवले दगड

कडक्याच्या थंडीतही बाळ राहिले जीवंत...

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st October, 12:10 pm
एमपी : नोकरी वाचवण्यासाठी शिक्षक पित्याने नवजात बाळाला जंगलात सोडले; वरून ठेवले दगड

छिंदवाडा: नोकरी जाण्याच्या भीतीने एका पाषाणहृदयी शिक्षक पित्याने आपल्या केवळ ३ दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात दगडाखाली दाबून सोडून दिल्याची थरकाप उडवणारी घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे घडली आहे. सरकारी नियमांमुळे चौथे अपत्य जन्माला आल्यास नोकरी जाईल या भीतीपोटी आई-वडिलांनी हे अमानुष पाऊल उचलले. नशिबाने, रात्रभर थंडी आणि मुंग्यांशी संघर्ष करणाऱ्या या निरागस बाळाला गावकऱ्यांनी वाचवले असून, सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


ग्रामीण बच्चे के रोने की आवाज सुनकर पहुंचे तो पत्थरों के नीचे मासूम को देखा।


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू डांडोलिया आणि राजकुमारी डांडोलिया (दोघेही नांदनवाडी प्राथमिक शाळेत शिक्षक) यांना यापूर्वीच तीन मुले आहेत. चौथे अपत्य झाल्यास सरकारी नियमांनुसार नोकरी जाईल, या भीतीने त्यांनी गर्भधारणाच जगापासून लपवून ठेवली होती.




२३ सप्टेंबरच्या पहाटे साधारण ३ वाजता घरीच बाळाचा जन्म झाला. यानंतर लगेचच दोघा संशयितांनी नवजात बाळाला नांदनवाडी गावाजवळील घनदाट जंगलात नेले आणि दगडाखाली ठेवून सोडून दिले. सकाळी जेव्हा काही ग्रामीण लोक  सरपण आणण्यासाठी जंगलात गेले, तेव्हा त्यांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने आवाजाच्या दिशेने जात काही दगड बाजूला केले, तेव्हा त्यांना तो निरागस जीव जिवंत आणि थरथरताना आढळला.




डॉक्टरांच्या मते, रात्रभर थंडीत राहिल्यामुळे आणि मुंग्यांनी चावा घेतल्यामुळे बाळाला संसर्ग होण्याचा मोठा धोका होता. तातडीच्या उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असून, त्याची प्रकृती आता स्थिर आहे.



या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. धनोरा पोलिसांनी सध्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, परंतु गावकऱ्यांनी हा 'खुनाचा प्रयत्न' असल्याचे सांगत बीएनएसच्या कलम १०९  अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस चौकी प्रभारी लखनलाल अहिरवार यांनी 'डीएनए चाचणी' नंतरच अंतिम कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. अमरवाडा बीआरसी विनोद वर्मा यांनी या घटनेला 'समाजासाठी लज्जास्पद' म्हटले असून, संबंधित शिक्षकावर जिल्हा स्तरावरून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा