घरे, इमारती व पायाभूत सुविधांचा विध्वंस : ढिगाऱ्यात शेकडो लोक अडकले
फिलिपाईन्स: फिलिपाईन्स येथे विध्वंसकारी भूकंपाने (earthquake) हाहाकार उडवला आहे. रिश्टर स्केलमध्ये ६.९ एवढा शक्तीशाली भूकंपाचा झटका बसला. त्यात आता पर्यंत ६० जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती पुढे आली आहे. १५० पेक्षा जास्त दुखापतग्रस्त झाले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यात अनेक इमारती, घरे, पायाभूत सुविधांचा विध्वंस झाला आहे. ढिगाऱ्यात शेकडो लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
सेबुच्या उत्तर किनाऱ्यावर स्थानिक वेळापत्रकानुसार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यामुळे परिसरातील निवासी इमारती कोसळल्या, जमीन खचली व भूस्खलन ही झाले. रस्त्यांवर भेगा पडल्या, झाडे, विजेचे खांब कोसळले तर पायाभूत सुविधांची जबर हानी झाली. वीज पुरवठा खंडीत झाला व शहरात सर्वत्र काळोखाचे साम्राज्य निर्माण झाले.
यूएस जिओलाॅजिकल सर्व्हेने सुरवातीला भूकंप ७.० तीव्रतेचा असल्याचे सांगितले. त्यानंतर तीव्रता कमी केली. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
भूकंपापूर्वी वादळही घोंगावले
फिलिपाईन्स मध्ये भूकंपापूर्वी वादळही घोंगावले व सेबू आणि अन्य प्रांतामध्ये 'बुआलोई' या चक्रीवादळाने ही तडाखा दिला. यामुळे फिलिपाईन्सात २७ जण मृत्यूमुखी पडले. झाडे अंगावर पडल्याने व पाण्यात बुडून हे लोक मरण पावले. वादळामुळे ही अनेक शहरात वीज गायब झाली.