पोलंडच्या पॅरा ॲथलिट रोजा कोजाकोव्स्का यांच्या जिद्दीने जग झाले थक्क
नवी दिल्ली: खेळ जगतात अनेक प्रेरणादायी कहाण्या आहेत, पण पोलंडच्या पॅरा ॲथलीट रोजा कोजाकोव्स्का यांनी केलेली कामगिरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. दिल्लीत सुरू असलेल्या २०२५ न्यू वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रोजा कोजाकोव्स्का यांनी एक अकल्पित गोष्ट साध्य केली. सकाळपर्यंत रुग्णालयाच्या बेडवर उपचार घेणाऱ्या रोजा यांनी संध्याकाळी मैदानात जिवाची बाजी लावून सुवर्णपदकास गवसणी घातली व साहस आणि दुर्दम्य जिद्दीचे एक नवे उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
३० सप्टेंबर रोजी सकाळी रोजा यांना अचानक उष्माघाताचा (Heat Stroke) झटका आला आणि डिहायड्रेशनमुळे चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या. उलट्या आणि अशक्तपणामुळे त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना स्पष्टपणे विश्रांती घेण्याचा आणि स्पर्धेत भाग न घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु, रोजा यांनी डॉक्टरांना ठामपणे सांगितले, मी इथे केवळ उपस्थित राहण्यासाठी नाही, तर खेळण्यासाठी आले आहे. त्यांनी डॉक्टरांकडून कशीबशी एनओसी मिळवली आणि थेट स्टेडियम गाठले.
संध्याकाळी रोजा यांनी महिला एफ-३२ क्लब थ्रो स्पर्धेत भाग घेतला. शरीर थकलेले असतानाही त्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द अभूतपूर्व होती. त्यांनी २९.३० मीटरचा थ्रो फेकला. हा थ्रो त्यांच्या स्वतःच्या विश्वविक्रमापेक्षा थोडा कमी असला तरी, चॅम्पियनशिपमधील नवा विक्रम ठरला आणि याच थ्रोमुळे त्यांनी सुवर्णपदक पटकावले.
सामन्यानंतर त्यांनी भावूक होत प्रतिक्रिया दिली. हे पदक मी भारतीय डॉक्टरांना आणि त्यांच्या टीमला समर्पित करते. त्यांचा सहकार्य आणि काळजी नसती, तर मी मैदानात परत येऊ शकले नसते, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांच्या कोचला देखील त्यांनी धन्यवाद दिले. जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास आणि लढवय्या मानसिकता मला माझ्या कोचकडून मिळाली. त्यांनी कधीही त्याचा माझ्यावर असलेला विश्वास ढळू दिला नाही. मी आज जे काही आहे ते त्याच्यामुळेच असेही त्या म्हणाल्या.
संघर्षातून साकारलेला प्रवास
रोजा यांच्या जीवनाचा प्रवास संघर्षांनी भरलेला आहे. लहानपणी त्यांना रक्तविकारासाठी (Blood Disorder) केमोथेरपी घ्यावी लागली. त्यानंतर लाईम डिसीजमुळे त्यांच्या चारही अवयवांमध्ये पक्षाघातासारखी (Quadriplegic) लक्षणे दिसू लागली. या सर्व संकटांवर मात करत त्यांनी २०१९ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि टोकियो २०२० पॅरालंपिकमध्येही पदके जिंकली आहेत. भारतात आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक पॅरा क्रीडा स्पर्धेत १०४ देशांतील २२०० हून अधिक ॲथलीट भाग घेत आहेत, पण सध्या सर्वाधिक चर्चा रोजा कोजाकोव्स्का यांच्या नावाची आहे.