माथेफिरुच्या धक्कादायक कारनाम्यांनी अवघे युपी हादरले!
हापुड : हापुड आणि मेरठमध्ये विमा क्लेम मिळवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या आई-वडिलांसह तब्बल आपल्या पत्नीची हत्या केल्याचा सनसनाटी प्रकार उघडकीस आला आहे. मेरठच्या गंगानगर येथील रहिवासी असलेल्या विशाल सिंघल नावाच्या या व्यक्तीने पैशांच्या हव्यासापोटी चक्क १४ विवाह केले आणि विम्याची रक्कम हडपण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीला क्रूरपणे संपवले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती लागलेल्या धागेदोऱ्यांनी सर्वांनाच हादरवून टाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठची एक महिला दलाल विशालला विवाह लावून देत असे. या प्रत्येक लग्नासाठी ती महिला दोन ते तीन लाख रुपयांची दलाली घेत होती. याच दलालाने विशालचा चौथा विवाह श्रेयासोबत लावून दिला होता. विशालचे हे षडयंत्र उघडकीस आल्यानंतर पोलीस आता त्याला मदत करणाऱ्या दलाल महिलेसह इतर दोन आरोपींच्या शोधात आहेत.
आई-वडिलांसह पत्नीची हत्या; ५० कोटींच्या विम्याकडे लक्ष
विशालने अनेक वर्ष हा खुनी खेळ सुरू ठेवला होता. २२ जून २०१७ रोजी विशालने हापुडच्या पिलखुवा येथे आपली आई प्रभा देवी यांची हत्या केली आणि याला अपघाताचे रूप दिले. यातून त्याने विम्याचे २५ लाख रुपये हडपले. त्यानंतर २०२२ मध्ये पहिली पत्नी एकता सिंघल हिला मेरठच्या आनंद हॉस्पिटलमध्ये 'आजाराने मृत्यू' झाल्याचे दाखवून तिची ८० लाख रुपयांची विमा पॉलिसी क्लेम केली. महत्त्वाचे म्हणजे, या गुन्ह्यात हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याचेही उघड झाले आहे.
या सर्वात मोठी घटना १ एप्रिल २०२५ रोजी घडली, जेव्हा विशालने त्याचे वडील मुकेश सिंघल यांना गंभीर जखमी केले आणि नंतर मेरठच्या आनंद हॉस्पिटलमध्ये त्यांची हत्या घडवली. धक्कादायक बाब म्हणजे, मुकेश सिंघल यांच्या नावावर तब्बल ६४ विमा पॉलिसी होत्या, ज्यांची एकूण रक्कम ५० कोटींहून अधिक आहे. यापैकी दोन पॉलिसीचे ५० लाख रुपये विशालला मिळाले आहेत.
पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे वाचला
विशालने अनेकदा अपघाताचा देखावा निर्माण करून पोलिसांना चकवले. पिलखुवा पोलिसांनी आईच्या हत्येच्या वेळी निष्काळजीपणा दाखवत प्रकरणावर अपघाताचे कलम लावून फाईल बंद केली. तसेच, वडिलांच्या मृत्यू प्रकरणातही विमा कंपन्यांनी संशय व्यक्त करून डीजीपींकडे तक्रार केली असतानाही, तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने हत्येला अपघात मानून फाइल बंद केली होती.
विशालची चौथी पत्नी श्रेयाने हत्येच्या भीतीने पोलीस स्थानकात आणि अधिकाऱ्यांकडे गयावया केली होती, परंतु 'पती-पत्नीचा वाद' म्हणून तिच्या तक्रारीकडे दुर्लक्षित करण्यात आले. सध्या संभलच्या एएसपी अनुकृती शर्मा या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. विशालचे सत्य समोर आल्यानंतर श्रेयाने विमा कंपन्यांना देखील विशालचे मनसुबे कथन केले.