बोडगिणी अपघातातील चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद
बोडगिणी-म्हापसा येथे अपघातात सापडलेली कार.
म्हापसा : बोडगिणी, म्हापसा येथे बीएमडब्ल्यू कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातातील गंभीर जखमी दुचाकीस्वार उमेश महेंद्र कुमार (३८, रा. म्हापसा व मूळ दिल्ली) याचे उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात घडल्यापासून मयत बेशुद्धावस्थेत होता.
सोमवार दि. २९ रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास हा अपघात घडला होता. उमेश कुमार हा जीए ०३ एबी ३७०४ क्रमांकाच्या अॅक्टीवा दुचाकीवरून मुख्य रस्त्यावर येत होता. तर जीए ०७ के ६८८८ क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू कारने जोयल टोनी रॉड्रिग्स (रा. ताळगाव) हे म्हापशाहून पणजीच्या दिशेने जात होते. वाटेत बोडगिणी येथे कारची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे रस्त्यावर कोसळून दुचाकीस्वार उमेश कुमार हा गंभीर जखमी झाला व त्याची शुद्ध हरपली. जखमीला १०८ रुग्णवाहिकेतून प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात व त्यानंतर पुढील उपचारार्थ गोमेकॉत त्याला हलविण्यात आले. उपचार सुरू असताना बेशुद्धावस्थेतच त्याचा बुधवारी (दि.१) रात्री मृत्यू झाला.
पोलीस हवालदार शिवाजी शेटकर यांच्या तक्रारीच्या आधारे या अपघातास कारणीभूत कार चालक जोयल रॉड्रिग्स याच्याविरुद्ध म्हापसा पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन हाकणे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश पाळणी हे करीत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मयत उमेश कुमार हा एसी आणि डीश टीव्ही मॅकानिकचा व्यवसाय करत होता. तो पत्नी व मुलांसमवेत म्हापसा येथे वास्तव्यास होता.